यंदाच्या पावसाचे वस्तिस्थान कुंभाराच्या घरी आणि मृगाचे वाहन बेडूक असल्याने वर्षांत सरासरी गाठणारा पाऊस पडेल. खरिपाचा स्वामी शनि असल्याने धान्य कमी, मात्र रब्बीचा स्वामी गुरू असल्याने पाऊस चांगला अपेक्षित असल्याचा अंदाज शुक्रवारी गुढी पाडव्यानिमित्त सार्वजनिक पंचांग वाचनातून व्यक्त करण्यात आला.
गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ग्रामीण भागात पंचांग वाचन करण्यात आले. गावच्या जोशींनी मुलकी पाटलांच्या आदेशाने गावचावडी व पारकट्टयावर पंचांग वाचन केले. दुष्काळामुळे होरपळ सुरू असताना पिण्याच्या पाण्यासाठी काही गावात दाही दिशा धुंडाळाव्या लागत असताना पंचांगात आगामी वर्षांत समाधानकारक पाऊस वर्तविण्यात आला आहे.
यंदा कुंभाराच्या घरी पावसाचे वस्तिस्थान असल्याने खंडित पर्जन्यवृष्टीमुळे अन्नधान्याची नासाडी होण्याची भीती आहे. दोन आढक म्हणजे सर्वसाधारण पर्जन्यमान असून चार ते पाच नक्षत्रामध्ये पाऊस चांगला होणार आहे.
२५ मे पासून रोहिणीचा पाऊस सुरू होत असून ७ जूनरोजी मृग नक्षत्र सुरू होत आहे. या नक्षत्राचे वाहन बेडूक असून पाणस्थळ राहण्याची बेडकाची नसíगक प्रवृत्ती असल्याने पाऊस चांगला होईल असे अनुमान आहे. मात्र यानंतर येणाऱ्या आद्र्रा नक्षत्राचे वाहन उंदीर आहे. या नक्षत्रात पाउस मध्यम असला तरी खरिपाच्या पेरण्या करण्याची चांगली संधी हे नक्षत्र देणार आहे. ५ जुल रोजी पुनर्वसू नक्षत्र सुरू होत असून या नक्षत्राचे वाहन कोल्हा असल्याने पावसाळी वातावरण तयार झालेले पाहण्यास मिळेल, मात्र कोल्ह्याचा लबाडाचा स्वभाव या नक्षत्रात अनुभवण्यास मिळण्याची शक्यता आहे.
पुष्य नक्षत्र १९ जुल रोजी रात्री १० वाजून ७ मिनिटांनी सुरू होत असून मोर वाहन आहे. मोराच्या थुई थुई नाचण्याप्रमाणे पाउस पडेल. हा पाउस खरिपाला उपयुक्त ठरण्याची शक्यता असून आंतरमशागतीला बळीराजाला संधी मिळणार आहे. मात्र उष्णतामानातील बदलामुळे खंडित वृष्टीची शक्यता नाकारता येत नाही. आश्लेषा नक्षत्राची सुरूवात २ ऑगस्ट रोजी होत असून याचे वाहन हत्ती आहे. ग्रह युतीमुळे पर्जन्यास मध्यम स्थिती अनुकूल आहे. वाहन हत्ती पर्जन्यकारक असल्याने दमदार पाउस होईल.
मघा नक्षत्राचा प्रारंभ १६ ऑगस्टला होत असून याचे वाहन बेडूक आहे. या नक्षत्रामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीचा धोका संभवतो आहे. दमदार पाउस झाल्याने ओढे नाले दुथडी भरून वाहतील. विहिरींना समाधानकारक पाणी येईल. ३० ऑगस्ट रोजी पूर्वा नक्षत्र सुरू होत असून याचे वाहन गाढव असल्याने पाउस समाधानकारक होईल. उत्तरार्धात चांगला पाऊस होईल. घोडा या वाहनावर उत्तरा नक्षत्र असून या नक्षत्राची सुरूवात १३ सप्टेंबर रोजी होणार आहे. रब्बी पिकांच्या पेरणीला हा पाऊस उपयुक्त ठरतो. यंदा या नक्षत्राचा पाऊस मध्यम आहे. हस्त नक्षत्र २६ सप्टेंबर रोजी सुरू होत असून या नक्षत्राचे वाहन उंदीर आहे. या नक्षत्रातही यंदा चांगला पाऊस दर्शवत आहे. यानंतर येणाऱ्या चित्रा आणि स्वाती नक्षत्रामध्ये पावसाचे प्रमाण मध्यम राहणार आहे.
एकंदरीत आगामी वर्षांत पाऊसकाळ मध्यम स्वरूपाचा असून समाधानकारक स्थिती राहील, असा अंदाज यावेळच्या पंचांगवाचनात करण्यात आला. अलीकडच्या काळात मोबाईलवर इंटरनेटच्या माध्यमातून पावसाचा आणि हवामानाचा अंदाज पाहिला जात असल्याने या पंचांगाच्या अंदाजाकडे तरूण फारसा गांभीर्याने पाहत नसला तरी ग्रामीण भागात आजही पंचांग वाचन श्रध्देने ऐकणारे आहेत.