मिरजेतील एका घरातून शनिवारी सुमारे तीन कोटींची रोकड हस्तगत करण्यात आली. या रकमेची मोजदाद सायंकाळपर्यंत सुरू होती. या प्रकरणी मनुद्दीन मुल्ला या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. साध्या पत्र्याच्या घरात ही रोकड मिळाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ही रक्कम खाजगी भिशीची असावी, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. हा तरुण सुयोग मोटर्समध्ये काम करणारा कर्मचारी असल्याची माहिती पोलीसांना मिळाली आहे.
आज दुपारी सांगलीत एका तरुणाजवळ १ लाख २९ हजारांची रक्कम आढळून आली. याबाबत चौकशी करीत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांना संशय आला. रोख रकमेबाबत समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने पोलिसांनी त्याच्या मिरजेतील बेथेलनगर परिसरात असलेल्या पत्र्याच्या घरात झडती घेतली. या वेळी हजार व पाचशे रुपयांच्या असली नोटा मिळाल्या.
या रकमेची मोजदाद बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. तीन कोटींची ही रोकड असावी असा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी पोलीस उप अधीक्षक धीरज पाटील यांनीही भेट देऊन पाहणी केली. रोकडची मोजदाद रात्री उशिरापर्यंत चालणार असून त्यानंतर एवढी मोठी रक्कम कशासाठी आणली, रोकड कोणाची याबाबत चौकशी करण्यात येईल असे सांगण्यात आले.