करोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी करोनाचे तीन रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्हा प्रशासन पुन्हा एकदा सतर्क झाले आहे. रुग्ण आढळलेल्या गावचा परिसर सील केला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोनतीन दिवसांत करोनाचे रुग्ण फारसे आढळले नाहीत. उलट करोनामुक्त होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र आज दाखल झालेल्या अहवालानुसार तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजरा तालुक्यातील हरुर येथून येथे मुंबईहून आलेल्या माय लेकरांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

गावकऱ्यांची मागणी झिडकारली

यातील ४१ वर्षीय महिला मुंबई पोलीस सेवेत आहे. मुलाचे निधन झाल्याने मृतदेह घेऊन महिला लहान मुलासह ६ मे रोजी गावी आली होती. गावातील लोकांनी गावात अंत्यसंस्कार न करता मुंबईत करा, असा सल्लाही दिला होता. तरीही या महिलेने ग्रामस्थांच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले आणि हिरण्यकेशी नदीकाठावर अंत्यसंस्कार केले. या अंत्यसंस्कार विधीकडे गावकऱ्यांनी पाठ फिरवली होती. या महिलेची व मुलाच्या घशाच्या स्रावाची तपासणी करण्यात आली. त्या दोघांचेही अहवाल पॉझिटिव्ह आहेत. ही घटना उघडकीस आल्यानंतर आज हरुर गावांमध्ये तीन किलोमीटरचा परिसर सील करण्यात आला आहे. २८ लोकांना संस्थात्मक अलगीकरण केंद्रात दाखल केले आहे. दरम्यान, चंदगड तालुक्यातील अलबादेवी येथील एका व्यक्तीचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.

..तर कोल्हापूरचे सोलापूर होईल

दरम्यान, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी नगरसेवकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. या बैठकीत नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांनी कोल्हापुरात मोठय़ा प्रमाणात लोक परत येत असल्याने निर्माण होणाऱ्या धोक्याकडे लक्ष वेधले आहे. जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे सक्तीने संस्थात्मक अलगीकरण केले जावे. अन्यथा कोल्हापूर जिल्ह्याची अवस्था सोलापूर व कराडसारखे होईल, असा गंभीर इशारा प्रशासनाला दिला आहे. कोल्हापूरमध्ये येणारे लोक प्रामुख्याने मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद, नाशिक, पालघर असा लाल दर्जा असलेल्या अति धोक्याच्या ठिकाणापासून येत आहेत. तेथून येणाऱ्या लोकांमुळे कोल्हापुरातील नागरिकांना करोनाचा संसर्ग होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.

नाक्यावर वाहनांची रीघ

दरम्यान, शासनाने राज्यांतर्गत प्रवासाला काही नियम परवानगी दिली आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरामध्ये महानगरातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत चालली आहे. वारणानगर वारणा नदी येथे पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली आहे. या ठिकाणी शनिवारी दिवसभर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. शेकडो प्रवासी कोल्हापुरात वाहनातून प्रवेश करत असल्याच्या चित्रफिती समाज माध्यमातून अग्रेषित होत आहे. या प्रवाशांची संख्या पाहून नागरिकांतून भीती व्यक्त केली जात आहे.