दयानंद लिपारे

टाळेबंदीमुळे कोल्हापूर जिल्ह्य़ातील उद्योगजगतासमोरील अर्थचिंता वाढीस लागली आहे. कोल्हापुरातील उद्योगजगताचे सुमारे तीन हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यात सर्वात मोठा घटक असलेल्या फौंड्री- इंजिनीअरिंग,वस्त्रोद्योग, चांदी, अन्य व्यापार यांना जबरदस्त फटका बसला आहे. कामगारांच्या वेतनावरून उद्योजक- कामगार संघटना यांच्यात औद्योगिक कलह निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

सध्या लागू असलेल्या टाळेबंदीचा परिणाम व्यापार, उद्योगजगतावर झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्य़ामध्ये पंचतारांकित औद्योगिक वसाहतीसह डझनभर औद्योगिक वसाहती आहेत. कोल्हापूर शहरामध्ये फौंड्री- इंजिनीअरिंग स्थिरावला आहे. इचलकरंजी परिसर वस्त्र उद्योगाचे केंद्र आहे. आधीच विजेचे चढे दर, मंदी यामुळे उद्योगांमध्ये निराशेचे चित्र होते. पण परिस्थिती सुधारते तोच करोना साथीमुळे गंभीर प्रश्न उभे ठाकले आहेत.

मोठा आर्थिक फटका

आतापर्यंत फौंड्री उद्योगाचे सुमारे ७०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. वाहतूक ठप्प झाल्यामुळे अमेरिका, युरोपीय देशांमध्ये निर्यात बंद झाली आहे, असे दि इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियन फौंड्रीमेनचे अध्यक्ष सुमित चौगुले यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. उद्योग बंद असला तरी विजेचा स्थिर आकार, कामगार पगार, अन्य काही देणी याचे ओझे उद्योजकांच्या खांद्यावर आहेच. एकीकडे उत्पन्न घटले असताना खर्चाच्या बाजू वाढल्या असल्याने उद्योग चालवणे कठीण बनले आहे. त्यामुळे केंद्र शासनाने उद्योगाला मदतीचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. ट्रॅक्टरनिर्मितीसह काही विभागांना अलीकडे थोडीफार चालना मिळाली होती. जानेवारीपासून मागणी वाढीस लागली. फेब्रुवारीत ती आणखी वाढली. मार्चमध्ये उच्चांक गाठला होता. उद्योग स्थिर होतोय असे वाटत असतानाच टाळेबंदी जाहीर झाल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. टाळेबंदीचा कालावधी वाढवला जाणार असल्याचे संकेत दिले जात आहेत. त्यातूनही काही उद्योग सुरू झालेच तरी उद्योगाचे गाडे पूर्वपदावर येण्यास बराच कालावधी जाणार आहे. यामध्ये उद्योजकांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे.

फौंड्री उद्योगाची आठ हजार कोटींची उलाढाल

कोल्हापूर जिल्ह्य़ात फौंड्री उद्योग तीनशेहून अधिक आहेत. त्यांची वार्षिक उलाढाल सुमारे ८ हजार कोटी रुपयांची आहे. येथे दर महिन्याला ७० ते ८० हजार टन कास्टिंग बनवले जाते. ते मुख्यत्वेकरून टाटा, महिंद्रा, जॉन डियर आदी बडय़ा वाहननिर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडे पाठवले जाते. यात निर्यातीचे प्रमाणही जवळपास १५ टक्के असून दरवर्षी सुमारे ७०० कोटी रुपयांची निर्यात केली जाते. टाळेबंदीमुळे सर्व प्रकारचे व्यापारसुद्धा बंद आहेत. अन्नधान्य, तयार कपडे, हॉटेल, वाहतूक, तेल, वाहनांचे सुटे भाग, गृहोपयोगी- इलेक्ट्रॉनिक साधने आदी पंधरा हजारांहून अधिक व्यापाऱ्यांना दररोज कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले आहे. उद्योग बंद असल्याने आर्थिक व्यवहार थंडावले आहेत.

उत्पादित मालाचा साठा पडून आहे. तो कंपन्यांकडे पोहोचल्यानंतर देयके येण्यास कालावधी लागणार आहे. उद्योगाची घडी बसवणे आव्हानात्मक आहे. शासनाने उद्योगाला मदतीचा हात द्यावा. त्यावाचून उद्योग चालवणे कठीण आहे.

– हेमंत कुलकर्णी, उद्योजक