कोल्हापूर : प्रदीर्घ कालावधी नंतर कोल्हापूर जिल्ह्यतील दुकाने रामप्रहरी उघडली गेली. प्रदीर्घ काळानंतर दुकाने उघडताना व्यापाऱ्यांमध्ये उत्साह होता. खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केल्याने आर्थिक चलन वलन सुरू झाल्याचे दिसून आले.

जिल्ह्यतील गेल्या शंभर दिवसाच्या प्रदीर्घ टाळेबंदीमध्ये पाच दिवस अपवाद वगळता जीवनावश्यक श्रेणी व्यतिरिक्त इतर व्यापार बंद राहीले होते. यामुळे व्यापारी आर्थिक अरिष्टात सापडले. सातत्याने मागणी करूनही दुकाने सुरू करण्याचा निर्णय होत नसल्याने व्यापाऱ्यांनी तीव्र संघर्ष केला. व्यापाऱ्यांच्या लढय़ाला यश मिळाल्यानंतर सोमवार पासून शहर आणि जिल्ह्यत व्यवहार सुरू करण्यास परवानगी मिळाली. यामुळे आज व्यापाऱ्यांत उत्साह होता. जिल्ह्यच्या ग्रामीण भागातही नव्या जोमाने दुकाने उघडण्यात आली. यामुळे बाजारपेठात  एकच गर्दी झाली होती.

प्रबोधन आणि ग्राहक सवलत

व्यापा?ऱ्यांनी उत्साहाबरोबर सामाजिक जबाबदारीचेही भान ठेवले. सकाळी सजवलेल्या बैलगाडीतून सनई चौघडय़ाच्या मंजूळ स्वरांसह प्रबोधन फेरीचे आयोजन केले. ‘मुखपट्टी नाही-प्रवेश नाही’असे फलक हाती घेत नागरिकांचे प्रबोधन केले. जनतेत लसीकरणाबाबत जागृती व प्रोत्साहन मिळावे यासाठी लसीकरण झालेल्या ग्राहकांना राजारामपुरीतील सर्व प्रमुख दुकानांमधून विशेष सवलत  देण्यात येणार आहे, असे  ‘राजारामपुरी व्यापारी असोसिएशन’ चे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले.