कोल्हापूर शहरातील वाढत्या वाहतुकीचा ताण दूर करण्यासाठी आणि वाहतुकीला शिस्त लागावी, याकरिता पोलीस विभागाने सुमारे ५० पोलीस मित्रांना वाहतूक नियंत्रणाचे शनिवारी प्रशिक्षण दिले. पोलीस दलाला मनुष्यबळाची कमतरता जाणवत होती. आता पोलीसमित्र मदतीसाठी दाखल झाल्याने शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पोलीस अधीक्षक डॉ.मनोजकुमार शर्मा यांनी जिल्ह्यामध्ये पोलीस मित्र ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांच्या मदतीसाठी स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी पुढे येण्याचे आवाहन केले होते. त्याकरिता ५० पोलीस मित्रांनी सहकार्याचा हात पुढे केला आहे. या पोलीस मित्रांना शनिवारी सकाळी शहर वाहतूक नियंत्रण शाखा येथे वाहतूक शिस्त व कायदा तसेच सुव्यवस्थेसह गुन्हेगारी उघडकीस आणण्यासाठी कोणते प्रयत्न करावेत, याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले. पोलीस मित्रांना झेब्रा क्रॉस पट्टय़ाअलीकडे वाहने उभी करणे, डावी बाजू मोकळी ठेवून त्याबाजूची वाहतूक नियंत्रित करणे, पादचाऱ्यांना चालत जाऊ देणे यासह इतर वाहतूक विषयक नियम व सूचनांची माहिती देण्यात आली. या प्रशिक्षणानंतर दसरा चौक, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय यांसह काही प्रमुख मार्गावर प्रात्यक्षिक घेण्यात आले. या उपक्रमात स्वयंस्फूर्तीने सहभागी झालेल्या पोलीस मित्रांचे डॉ.शर्मा यांनी कौतुक केले. शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक आर.आर.पाटील यांनी शहाजी पाटील, संतोष सुलवाणी, दत्ता माळी, श्याम सरपटा यांच्यासह अन्य पोलीस मित्रांना प्रशिक्षित केले आहे.