वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ होण्यात विद्यार्थी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. विद्यार्थ्यांच्या सहभागातून ‘काऊंट ग्रीन’ अर्थात परिसरातील वृक्षांची गणना व माहितीचे संकलन हा उपक्रम राबविला जायला हवा, अशी अपेक्षा केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतिशास्त्र अधिविभागात साकारलेली देशातील पहिली ‘लीड बॉटॅनिकल गार्डन’ व ‘नीलांबरी सभागृह’ यांच्या उद्घाटनानंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
पश्चिम घाटातील जैवविविधतेचेही संरक्षण व संवर्धन करण्याची नितांत गरज असल्याचे सांगून जावडेकर म्हणाले, ‘डेव्हलपमेंट विदाऊट डिस्ट्रक्शन’ या पद्धतीने संवर्धनशील विकासाचे ब्रीद केंद्र सरकारने स्वीकारले आहे. त्यानुसार कोणतेही विकासकाम करत असताना त्याच्या पर्यावरणपूरकतेचा पूर्ण विचार केला जातो. त्यामुळे डॉ. एस. आर. यादव यांनी पश्चिम घाटात बायोडायव्हर्सिटी रीसर्च सेंटर सुरू करण्यासाठी केलेल्या सूचनेचा सकारात्मक विचार केला जाईल, असे सांगितले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शाळा, महाविद्यालये, शहरातील कॉलनी यांच्या सहली आयोजित करून त्यांच्यात वनस्पतींच्या संवर्धनाविषयी जागृती केली गेली पाहिजे, त्यांना रोपेही दिली जावीत, अशी सूचना केली.
भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्थेचे संचालक परमजित सिंग म्हणाले, भारत हा जैवविविधतेने समृद्ध असलेला देश आहे. या जैवविविधतेचे संवर्धन करण्यात तसेच शैक्षणिक जाणीवजागृती निर्माण करण्यात लीड बॉटॉनिकल गार्डनसारखे उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावतात.
प्रा. डॉ. एस. आर. यादव यांनी अन्न, आरोग्य आणि श्वास या साऱ्या गोष्टी प्राणिमात्रांना केवळ वनस्पतींमुळेच मिळतात. त्यामुळे त्यांचे संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, अशा शब्दांत त्यांनी वनस्पतींचे महत्त्व स्पष्ट केले.