वृक्षारोपणाची महती सांगणाऱ्या राहुरी कृषी विद्यापीठाच्या जागेत गतवर्षी झालेली वृक्षतोडीची तक्रार ताजी असतानाच आता पुन्हा एकदा मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड झाल्याचा प्रकार पुढे आला आहे. याबाबत बुधवारी प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेने महापालिका पी शिवशंकर यांना प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षाचा निषेध नोंदवत निष्फळ ठरलेली महापालिकेची तरू समिती बरखास्त करण्याची मागणी केली. महापालिका आपल्या सोयीसाठी कायदा धाब्यावर कसे बसवते हे या निमित्ताने उघड झाले आहे.
कसबा बावडा येथील राजर्षी शाहू जन्मस्थळालगत राहुरी कृषी विद्यापीठाची सुमारे १२ एकर जागा आहे. या जागेतील वृक्षतोड सातत्याने चच्रेत राहिली आहे. गतवर्षी विद्यापीठाच्या मालकीच्या जागेत बेकायदा वृक्षतोड करण्यात आली होती. यासंदर्भात प्रजासत्ताक संघटनेचे अध्यक्ष दिलीप देसाई, सचिव गुऱ्हान नाईकवाडे यांनी ३० जुलै, २०१५ रोजी महापालिकेचे आयुक्त तथा तरू समितीच्या अध्यक्षांकडे तक्रार केली होती. मात्र यासंबंधात कसलीच फौजदारी कारवाई पालिका प्रशासनाने केली नाही.
हा प्रकार ताजा असताना आता पुन्हा एकदा विद्यापीठातील याच भागातील मोठे वृक्ष जमीनदोस्त करण्यात आले आहे. यासाठी महापालिकेचे परवानगी घेणे गरजेचे होते. मात्र या ठिकाणी रस्ता होणार असल्याने महापालिकेच्या आशीर्वादानेच बेकायदा वृक्षतोड करण्यात आली आहे. वृक्षतोड करण्यापूर्वी नोटीस देणे, हरकती मागवणे, अशी कायद्यात तरतूद आहे. पण हा कायदा धाब्यावर बसवून वृक्षतोड केल्याचा आरोप देसाई यांनी केला आहे. कोल्हापूर शहरात वृक्षसंगोपन व संवर्धन करण्याची भाषा महापालिका प्रशासन करत असते, पण प्रत्यक्षात विकासकामाच्या नावाखाली मोठे वृक्ष जमीनदोस्त केले जात आहेत. हा प्रकार पुन्हा एकदा आयुक्तांच्या निर्दशनाला आणून देत प्रजासत्ताक संघटनेने कारवाईची मागणी केली आहेत. तसेच कर्तृत्वशून्य ठरलेली तरू समिती कुचकामी ठरली असल्याने ती बरखास्त करण्याची मागणीही करण्यात आली आहे.