कळंबा तलावातील गाळ काढण्याच्या कामास गती मिळाली असून आज अखेर अडीच लाख घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. पाटबंधारे विभाग, महापालिका तसेच लोकसहभागातून गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. एक्स्कॅव्हेटर, लोडर, डंपर यास आधुनिक यंत्र सामग्रीद्वारे गाळ काढण्याच्या कामाला गती मिळाली आहे. शेतकरी ट्रक, ट्रॅक्टर, डंपर अशा वाहनातून गाळ उचलून शेतीसाठी वापरत आहेत.
कळंबा तलावातील गाळ काढण्याच्या कामासाठी शासकीय यंत्रणेबरोबर लोकसहभाग लाभला असून अनेक शेतकरी गाळ उचलण्यासाठी पुढे आले आहेत. पाटबंधारे विभागाच्या वतीने आतापर्यंत १ लाख ३० हजार घन मीटर गाळ काढण्यात आला असून लोकसहभागातून १ लाख २० हजार घन मीटर गाळ काढण्यात आला आहे. पाऊस पडेपर्यंत कळंबा तलावातील गाळ काढण्याची मोहिमे सुरू ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी यांनी आज दिले.
ऐतिहासिक कळंबा तलाव या वर्षीच प्रथमच कोरडा पडला असून या तलावातील गाळ काढण्यास जलयुक्त शिवार अभियानातून सुरुवात करण्यात आली आहे. कळंबा तलाव परिसरातील गावकऱ्यांनी गाळ उचलून शेतीसाठी न्यावा, गाळ काढण्याची मोहिमेत शासन यंत्रणेबरोबरच गावकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी सक्रिय व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.