कोल्हापूर शहरासह उपनगरांमध्ये बंद घरांची टेहाळणी करून रात्रीच्या वेळी ते फोडून लाखोंचा ऐवज लंपास करणाऱ्या दोघा सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.

प्रशांत काशिनाथ करोशी, (वय ३५, रा. इस्पुरली, ता. करवीर, सध्या रा. पुणे) व अविनाश शिवाजी आडकर (वय २८, रा. धामणे ता. आजरा) अशी त्यांची नावे आहेत. न्यायालयाने दोघांना १४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या दोघांनी अकरा घरफोडीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्याकडून ३४ तोळे सोन्या-चांदीचे दागिने, एक रिव्हॉल्वर, जिवंत काडतुसे, एक कार असा सुमारे २७ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेली रिव्हॉल्वर ही पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रकाश बांदिवडेकर याची असल्याची माहिती पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी गुरुवारी दिली.

कोल्हापूर शहर व परिसरात बंद घरे फोडण्याचे प्रकार वाढल्याने ते रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी विशेष पथक नेमले होते. या पथकातील पोलीस नाईक नितीन चोथे यांना सराईत चोरटा प्रशांत करोशी हा शियेफाटा (ता. हातकणंगले) येथे येणार असल्याची माहिती मिळाल्याने सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे असणारी मोटार त्याचा साथीदार अविनाश आडकर या दोघांनी चोरल्याची कबुली दिली.