२३ जणांना अटक

बेळगाव शहरात सोमवारी रात्री दगडफेक, जाळपोळ आणि अ‍ॅसिड फेकण्याच्या घटना घडल्या. यामुळे शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली असून या प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी २३ जणांना अटक केली आहे. दोन गटातील वादातून ही घटना घडली आहे.

बेळगाव शहरात मागील महिन्यात दोन समाजामध्ये हिंसक घटना घडल्या होत्या. या पाश्र्वभूमीवर काल दगडफेकीच्या घटना घडल्या.  यामुळे शहरात पुन्हा तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. काल रात्री अकराच्या सुमारास शहरातील खडक गल्ली, जालगार गल्ली, दरबार गल्ली यासह आसपासच्या परिसरात दोन गटात तुफान दगडफेक करण्यात आली. समाजकंटकांनी दगडांचा तुफान मारा करीत अनेक वाहनांना लक्ष्य बनविले. काही वाहने जाळण्यात आली. तसेच काही ठिकाणी घरांमध्ये घुसून मारहाणही करण्यात आली. ही दहशत थांबविण्यासाठी पोलिसांना मध्यरात्री लाठीमार आणि अश्रूधुराच्या नळकांडय़ा फोडाव्या लागल्या. समाजकंटकांच्या या हल्ल्यात अनेक नागरिकांबरोबर वरिष्ठ पोलीस अधिकारी शंकर मारिहाळ हे देखील जखमी झाले आहेत.

समाजकंटकांच्या या हल्ल्यात अनेक वाहने, दुकानांचे नुकसान झाले आहे. तर ४ वाहने जाळण्याात आली आहेत. या घटनेनंतर लगेच पोलिसांनी खबरदारीच्या उपाययोजना सुरू करत संशयितांची धरपकड सुरू केली. आतापर्यंत २३ जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान शहरात जमावबंदीचे आदेश देण्यात आले असून बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.