विरोध असतानाही बहिणीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून दोन भाऊ व त्यांच्या मित्राने सख्खी बहीण व तिच्या पतीचा चाकूने भोसकून निर्घृन खून केल्याची खळबळजनक घटना घडल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करून अवघ्या पाच तासांत तिघाही आरोपींना अटक केली. काल रात्री कसबा बावडा येथील गणेश कॉलनीत ही घटना घडली. गणेश पाटील, जयदीप पाटील व नितीन काशिद अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
दुहेरी हत्याकांडाची पाश्र्वभूमी अशी, इंद्रजित कुलकर्णी हा पन्हाळा तालुक्यातील बच्चे सावर्डे इथला रहिवाशी असून तो सध्या येथील एका मेडिकल स्टोअर्समध्ये काम करतो. मेघा ही शाहूवाडी तालुक्यातील थेरगांवची असून ती येथील डी मार्टमध्ये नोकरी करते. दोघांचेही शाळेत असल्यापासून प्रेम होते. इंद्रजित आणि मेघा यांनी २४ जून रोजी पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. त्यांच्या या विवाहाला मेघाच्या घराचा विरोध होता. प्रेमविवाहावरून गावकरी टोमणे मारत असल्याने दोन भावांना या विवाहमुळे फिरणे मुश्किल झाले होते. याचा राग त्याच्या मनात खदखदत होता. या पूर्वी मेघाचे भाऊ गणेश आणि जयदीप यांनी इंद्रजितला गुंडाकरवी बेदम मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यानंतर सहा महिने गणेशने मेघाकडे येणे-जाणे सुरू ठेवले होते. सहा महिन्यापूर्वीच इंद्रजितचा काटा काढण्याचा डाव यांनी आखला होता.
बुधवारी रात्री ९ वाजता गणेश आणि जयदीप हे दोघे आपला साथीदार नितीन काशीद याला घेऊन मोटारसायकलीवरून कसबा बावडय़ात आले. या दोघांनी नितीनला मोटारसायकलीवरच बसवून ते दोघे मेघाच्या घरात गेले, या वेळी चहा करण्यासाठी गेलेल्या आपल्या बहिणीच्या पाठीवर आणि गळ्यावर या दोघांनी सपासप वार केले. याचवेळी काही वस्तू आणण्यासाठी बाहेर गेलेला इंद्रजित घरी येताच त्याच्यावरही चाकूने या दोघा भावांनी वार केले. यामुळे संपूर्ण घरात रक्ताचा सडा पडला होता. इंद्रजितवर हल्ला होताना आरडाओरडा झाल्याने घरमालक प्रभाकर जाधव यांच्या पत्नीने खोलीकडे धाव घेतली. तेव्हा हे दोघे घरातून पळून गेले. बाहेर मोटारसायकलीवर बसलेल्या नितीनला मोटार सायकल सुरू करण्यास सांगून ते तिघे पळून गेले. या दोघा भावांनी केलेले कृत्य नितीनला माहिती नव्हते. नितीन हा मुकबधीर असून त्याला हालचाली केल्याशिवाय घटना समजत नाही. त्यानंतर हे तिघे शाहूवाडीतील चरण गावातील एका लग्नाच्या वरातीत सामील झाले. या ठिकाणाहून कोल्हापूर पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतले.