कोल्हापूर : कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सीमाप्रश्नाच्या विधानाचा उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी येथे परखड समाचार घेत कर्नाटकचे उपमुख्यमंत्री व शासनावर निशाणा साधला.

‘बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग आहे. सूर्यचंद्र असे पर्यंत तो महाराष्ट्राला मिळणार नाही,’ असे विधान कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केले होते. त्यांच्या समाचार घेत मुश्रीफ यांनी ‘चंद्रसूर्य कशाला तुमच्या उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याआधी बेळगाव महाराष्ट्रात असेल,’ असा टोला लगावला. आजपर्यंत सीमाभागातील मराठी भाषकांवर अन्याय झाला आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही सीमाभाग महाराष्ट्रात घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. कर्नाटकात भाजपचे सरकार असल्याने महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी त्यांनी समजवून सांगण्याची गरज आहे.

उपमुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य बालिश आहे. आपल्या नेत्यांना खूश करण्यासाठी ते वक्तव्य केले असून कर्नाटकच्या मंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला आव्हान देण्याची भाषा करू नये, असे सडेतोड उत्तर उदय सामंत यांनी सवदी यांना दिले. ‘एकीकडे देशात घुसखोरी सुरू आहेत. त्यांना या सीमा बंद करता आल्या नाहीत. मात्र महाराष्ट्रातल्या माणसांना एक नोव्हेंबरला कर्नाटकात प्रवेश रोखला जातो. कर्नाटक सरकारकडून गेल्या अनेक वर्षांपासून अशा पद्धतीची  मुस्कटदाबी सुरू आहे,’ असा आरोप करत त्यांनी कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रातले सर्वच मंत्री आज काळ्या फिती लावून काम करत असल्याचे त्यांनी नमूद केले.