18 October 2018

News Flash

‘नोटाबंदीमुळे उद्धव ठाकरे कॅशलेस’

नोटाबंदीमुळे उद्धव ठाकरे कॅशलेस झाले आहेत, त्यामुळे नोटाबंदी, जीएसटी या मुद्यांवरून डांगोरा पिटत चालले आहेत, अशी टीका भाजपचे प्रदेश सरचिटणीस, आमदार सुरेश हाळवणकर यांनी केली.

इचलकरंजी भाजपच्या वतीने आमदार हाळवणकर यांची प्रदेश सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

दोन दिवसांच्या दौऱ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र व राज्य शासनाला टीकेचे लक्ष्य केले असल्याने आता भाजपने प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. नोटाबंदीमुळे उद्धव ठाकरे कॅशलेस झाले आहेत, त्यामुळे नोटाबंदी, जीएसटी या मुद्यांवरून डांगोरा पिटत चालले आहेत, अशी टीका भाजपचे प्रदेश सरचिटणीस, आमदार सुरेश हाळवणकर यांनी केली.

इचलकरंजी भाजपच्या वतीने आमदार हाळवणकर यांची प्रदेश सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार शहर कार्यालयात आयोजित केला होता. त्या वेळी हाळवणकर यांनी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, देशाच्या हिताचा विचार डोळय़ांसमोर ठेवून नोटाबंदीचा निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा भविष्यात दिसणार आहे. जे कॅशलेस झाले आहेत, ते आज ओरडत सुटले आहेत. मात्र देशातील ९० टक्के जनता नोटाबंदीच्या समर्थनार्थ असल्याचा दावा त्यांनी केला.

मुख्यमंत्री व पंतप्रधान चांगली कामे करीत आहेत. ती कामे व त्यांचा विचार कार्यकर्त्यांनी तळागाळात पोहोचवणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतमध्ये निवडून आलेल्या सदस्यांनी पक्षासोबत एकनिष्ठ राहण्याचे आवाहन त्यांनी केले. या वेळी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा तसेच पराभूत झालेल्या उमेदवारांचा सत्कार आमदार हाळवणकर यांच्या हस्ते करण्यात आला. विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्त झालेल्या कार्यकर्त्यांचा सत्कार व प्रमाणपत्राचे वितरण झाले. भाजपच्या कार्यकर्त्यांना ओळखपत्राचे वाटप झाले. केंद्र सरकारच्या माध्यमातून १० कोटी रुपयांचा निधी ग्रामीण भागासाठी मंजूर झाल्याचे या वेळी सांगण्यात आले. जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, नगराध्यक्ष अलका स्वामी, नगरसेवक अजित जाधव यांची भाषणे झाली.

First Published on November 29, 2017 1:40 am

Web Title: uddhav thackeray cashless says mla suresh halwankar