22 February 2019

News Flash

उद्धव ठाकरे यांच्याकडून गुळाच्या गुणवत्तेची दखल

कोल्हापुरी गुळामध्ये पिवळ्या रंगासाठी रसायनांचे वाढते मिश्रण धोकादायक ठरत आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( संग्रहित छायाचित्र )

कोल्हापुरी गुळाच्या घसरत्या गुणवत्तेची, भेसळीची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून रविवारी दखल घेतली गेली आहे. ‘लोकसत्ता’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचा संदर्भ देत ठाकरे यांनी गूळ उत्पादनाच्या भेसळीबाबत चिंता व्यक्त केली आहे, याचवेळी कोल्हापुरी गुळाचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर गूळ उत्पादकांचे प्रबोधन करावे, अशा सूचना शिवसेनेचे येथील आमदार राजेश क्षीरसागर यांना केल्या आहेत.

कोल्हापुरी गुळामध्ये पिवळ्या रंगासाठी रसायनांचे वाढते मिश्रण धोकादायक ठरत आहे. या भेसळीमुळे कोल्हापूरच्या गूळ उत्पादनाच्या घसरत्या गुणवत्तेची उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली आहे. ‘लोकसत्ता’तील  बातमीच्या अनुषंगाने ठाकरे यांनी आमदार क्षीरसागर यांच्याशी आज संपर्क साधत कोल्हापुरी गुळातील भेसळ आणि खालावणारा दर्जा याबाबत चिंता व्यक्त केली.

ठाकरे यांनी संपर्क साधल्यानंतर आमदार क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कोल्हापुरी गुळाच्या दर्जाबाबत कोणते प्रयत्न करणार आहे यावर मत मांडले आहे. त्यांनी  म्हटले आहे की, कोल्हापूरच्या गुळाची प्रसिद्धी सातासमुद्रापार आहे. मात्र व्यावसायिक ईर्षां किंवा आर्थिकलाभापोटी गुळामध्ये होत असलेले भेसळीचे प्रमाण नावलौकिकास बाधा पोहोचविणारे आहे. येथील गुऱ्हाळघरांची संख्या पाहता त्यांची वार्षिक उलाढाल कोटय़वधी रुपये असल्याने साहजिकच या व्यवसायात अनेकजण आर्थिकहित जपण्याचे प्रयत्न करतात. गुळाला पिवळा रंग येण्यासाठी घातक रसायनांचा वापर मोठय़ा प्रमाणात होऊ लागल्याने तो आरोग्याच्या दृष्टीने खाण्यायोग्य रहात नाही.

राज्यस्तरावर बैठक आयोजित करणार

हा संदर्भ देऊन क्षीरसागर यांनी गूळ उत्पादकांच्या  समस्यांची सोडवणूक करण्याकरिता आपण राज्यस्तरावर विशेष बैठक आयोजित करणार असल्याची ग्वाही दिली. गूळ उत्पादकांनी वेळीच सावध होऊन भेसळ पूर्णपणे बंद करावी, अन्यथा कोल्हापुरी गूळ नामशेष होण्यास अवधी लागणार नाही, अशी भीती व्यक्त करत त्यांनी कोल्हापुरी गुळाचा दर्जा टिकवून ठेवून कोल्हापुरी गुळाच्या नावलौकिकात भर पाडण्याकरिता विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन गूळ उत्पादकांना  केले आहे.

First Published on January 15, 2018 2:34 am

Web Title: uddhav thackeray to note quality of jiggery