सरकारी आदेशानंतरही तीर्थक्षेत्रांकडून मौन

केंद्र सरकारने ५०० व १ हजार रुपयांच्या नोटा रद्दच्या पाश्र्वभूमीवर देवस्थानाकडील दानपेटय़ातील रक्कम रोजची रोज भरण्याचे आदेश दिले आहेत. पण या रकमेतील पाचशे, हजार रुपयांच्या नोटांचा तपशील जाहीर करण्यास मात्र टाळाटाळ केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. हा सर्वच प्रकार संशय निर्माण करणारा असून नोटांचा काळाबाजार होऊ नये, या मूळ हेतूला हरताळ फासणारा आहे.

हजार, पाचशे रुपयांच्या नोटांवर बंदी आल्यानंतर विविध ज्या ठिकाणी या निर्णयातील पळवाटा आहेत, असे सर्व मार्ग सरकारने बंद करण्याचे धोरण अवलंबले आहे. या अंतर्गतच देवस्थानच्या तिजोरीवरही सरकारचे लक्ष वेधले गेले. इथे जमा होणारी रक्कम आणि बँकेत भरली जाणारी रक्कम यातील नोटांच्या स्वरूपात फरक पडू नये यासाठी सरकारच्या वतीने सर्व देवस्थानांना त्यांच्याकडे जमा होणाऱ्या दानपेटीतील रक्कम रोजच्या रोज बँकेत भरण्याचे आदेश दिले. यानुसार ही देवस्थाने ही रक्कम बँकेत भरू लागली आहेत. परंतु त्यातील पाचशे आणि हजारांच्या नोटांचे तपशील मात्र त्यांच्याकडून सांगण्यास टाळाटाळ केली जात आहे.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अखत्यारीतील महालक्ष्मी मंदिर, जोतिबा मंदिरासह कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील अन्य मंदिरांमधील दानपेटय़ा बुधवारपासून उघडण्यात आल्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दानपेटय़ातील रकमेची मोजदाद सुरू असून पुढील आठवडय़ापर्यंत हे काम चालणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरातील दानपेटय़ा बुधवारपासून उघडण्यात आल्यानंतर पहिल्या दोन दिवसांत ३१ लाख रुपये आतापर्यंत जमा झाल्याचे सांगण्यात आले. शुक्रवारी करण्यात आलेल्या दोन दानपेटय़ांमधील रक्कम मोजणीमध्ये सुमारे २२ लाखांची रोकड मिळाली आहे. तर आज शनिवारी ७ पेटय़ांमध्ये ५ लाख ९१ हजार रुपये रोकड मिळाली. परंतु यातील पाचशे आणि हजाराच्या नोटांचे विवरण मात्र देण्यात आले नाही. असाच प्रकार अन्य देवस्थानांच्या बाबतीतही सुरू आहे.

खरेतर बँकेत कुठलीही रक्कम भरताना त्यामध्ये नोटांचा तपशील भरावा लागतो. याअंतर्गत हजार, पाचशे रुपयांच्या नोटांचा तपशील समजणे सहज शक्य आहे. पण हा तपशील न सांगता केवळ एकूण जमा रक्कम देवस्थानांकडून सध्या जाहीर केली जात आहे. हा प्रकार या एकूण व्यवहाराबद्दल संशय निर्माण करणारा आहे.