कोल्हापूर : कोल्हापूर शहर आणि परिसरात शुक्रवारी रात्री वाऱ्यासह मुसळधार पावसाने कोल्हापूर शहराला जोरदार तडाखा दिला. शिये येथील टोल नाका उखडला गेला होता, तो शनिवारी तातडीने दुरुस्त केल्याने वाहतूक सुरू झाली.

काल रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास वादळीवारा विजांच्या कडकडाट जोरदार पाऊस सुरू झाला. या पावसामुळे कोल्हापूर शहरासह परिसराला झोडपून काढले.  त्यामध्ये मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याचे वृत्त आहे.काही कारखान्यांनाही अशा स्वरूपाचा मोठा फटका बसला. शिये गावात ४० घरांचे पत्रे उडून गेले.

कोल्हापूर शहराला अंतर्गत टोल वसूल करण्यासाठी शिये येथे आयआरबी कंपनीने उभारलेली कमान सोसाटय़ाच्या वाऱ्याने आणि जोरदार पावसाने जमीनदोस्त झाली. त्यामध्ये सहा मोटारसायकलींचे नुकसान झाले. बंदोबस्तासाठी उभे असणारे पोलीस, पाच प्रवासी सुदैवाने बचावले. दरम्यान, आज महापौर यांच्यासह निलोफर आजरेकर, उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती संदीप कवाळे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत आदींनी घटनास्थळी धाव घेतली. कटरच्या साहाय्याने पडलेल्या शेडचा भाग कापण्यात आला. त्यानंतर राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला.

महावितरणचे नुकसान

महावितरणचे सुमारे ४५४ वीजखांब जमीनदोस्त झाले. खांबावरील तारा तुटल्या अशाही परिस्थितीत कर्मचाऱ्यांनी शनिवारी दिवसभर शहर व गावांचा वीजपुरवठा युद्धपातळीवर सुरळीत केला. ११ रोहित्रसुद्धा जमीनदोस्त झाले आहेत. विजेच्या कडकडाटामुळे शेकडो खांबावरील ‘इन्सुलेटर’ फुटून तारा खांबावर निखळून पडल्या आहेत. टाळेबंदीमुळे कंत्राटदारांना कामगार मिळत नसल्याने काल रात्रीपासून कर्मचारी अहोरात्र झटत आहेत.