बहुराज्य संस्था नोंदीवरून सत्ताधारी समर्थकांची विरोधकांना मारहाण

कोल्हापूर : गोकुळ दूध संघ बहुराज्य संस्था नोंद करण्याच्या विषयावरून बुधवारी येथे झालेल्या करवीर तालुक्यातील संस्था प्रतिनिधींच्या संपर्क सभेत सत्तारूढ आणि विरोधी गटात हाणामारी झाली. विरोधी गटाने केलेला विरोध पचनी न पडल्याने सत्ताधाऱ्यांनी संस्था प्रतिनिधींच्या अंगावर धावत जाऊन मारहाण केली.

लोकशाही मार्गाने प्रश्न उपस्थित करत असताना, अशा प्रकारे गुंडशाही प्रवृतीने संस्था प्रतिनिधींना मारहाण झाल्याच्या प्रकाराचे तीव्र पडसाद उमटत आहेत. त्यामुळे सत्ताधारी संचालक मंडळाच्या गुंड प्रवृतीचा गोकुळ बचाव कृती समितीच्या सदस्यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. या विरोधात पोलीस फिर्याददेखील दाखल करणार असल्याचे पत्रकारांना सांगण्यात आले.

गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये दूध संघ बहुराज्य संस्था नोंद करण्याचा विषय आहे. त्यावरून वाद झडत आहे. पाश्र्वभूमीवर तालुकानिहाय संस्था प्रतिनिधींच्या संपर्क सभा सुरू आहेत. आज करवीर तालुक्यातील संस्थांची संपर्क सभा गोकुळच्या येथील ताराबाई पार्कातील कार्यालयात झाली. या  गोकुळ बचाव कृती समितीचे संस्था प्रतिनिधीदेखील उपस्थित होते.

गोकुळमध्ये अनागोंदी कारभार सुरू असल्याने, या विरोधात कृती समितीच्या वतीने आवाज उठवला गेला. गोकुळ बहुराज्य करण्याचा ठराव असल्याने यालादेखील तीव्र विरोध केला. समितीच्या सदस्यांनी सत्ताधारी संचालक मंडळाचे वाभाडे काढत काही प्रश्न उपस्थित केले. मात्र संचालक मंडळाकडून यावर समाधानकारक उत्तरे मिळत नव्हती. कृती समितीच्या सदस्यांनी आक्रमकपणे आपले प्रश्न संपर्क सभेत मांडले.

त्यावर सत्ताधारी संचालक मंडळाचे कार्यकर्ते घोषणाबाजी करत अंगावर धावून आले. ही बाब ज्येष्ठ सभासद विश्वास नेजदार यांनी गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. तरीही संचालक मंडळाच्या समर्थकांनी नेजदार यांना मारहाण केली. बचाव समितीच्या इतर सदस्यांनी सत्ताधारी मंडळींच्या समर्थकांना याचा जाब विचारला.  मात्र, त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आल्याने एकच गोंधळ उडाला. नेजदार यांच्यासारख्या ज्येष्ठ सभासदांना, गुंडशाही प्रवृत्तीच्या तरुणांनी मारहाण केल्याचे सांगत कृती समितीने निषेध व्यक्त केला. या विरोधात आज जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनादेखील निवेदन देण्यात आले.