कोल्हापूर : कोल्हापूर शहरातून परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांंची लसीकरण मोहीम महापालिकेने सुरू केली आहे. यासाठी नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले रुग्णालय येथे शिबिर आयोजित केले होते. या मोहिमेत शहरी ९३ व ग्रामीण ८ अशा १०१ विद्यार्थ्यांंना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस देण्यात आला. आमदार ऋतूराज पाटील यांनी यासाठी पाठपुरावा केला.

महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये १६ जानेवारीपासून करोना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. विविध वयोगटातील तसेच विविध संवर्गातील नागरिकांचे व कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू आहे. परदेशातील विद्यापीठामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची लसीकरणाअभावी शैक्षणिक संधी वाया जाण्याची शक्यता होती. यासाठी त्यांना प्राधान्याने लसीकरण सुविधा द्यावी असे पत्र पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले होते. तसेच आमदार ऋतुराज पाटील यांनीही जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन अशा विद्यार्थ्यांंना लसीकरण करण्याबाबत मागणी केली होती. शहरातील अशा विद्यार्थ्यांंची मागणी विचारात घेऊन त्यांच्यासाठी विषेस लसीकरण सत्राचे नियोजन महापालिकेने केले. उप आयुक्त निखिल मोरे, शिल्पा दरेकर यांनी मार्गदर्शन केले.