कोल्हापुरात लस संपली; केंद्रांवर मोठी गर्दी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यत करोना प्रतिबंधक लस आली तेव्हा ती टोचून घेण्यासाठी लोकांना प्रवृत्त करावे लागत होते. मात्र त्याचा संसर्ग झपाटय़ाने वाढू लागल्याने आता लसीकरण केंद्रावर तोबा गर्दी उसळली असून जिल्ह्यतील लस साठा गुरुवारी संपुष्टात आला. साडेपाच लाख लोकांचे लसीकरण झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

करोना प्रतिबंधक उपाय म्हणून लसीकरण मोहीम शासनाने हाती घेतली होती. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यत १६ जानेवारीपासून लसीकरणास सुरुवात करण्यात आली. प्रारंभी आरोग्य अधिकारी-कर्मचारी, शासकीय कर्मचारी यांना लसीकरण करण्यात आले. तेव्हा करोनाची साथ अल्प प्रमाणात असल्याने लोक लसीकरणासाठी पुढे येत नव्हते. त्यांनी लसीकरण करावे यासाठी शासकीय पातळीवरून प्रबोधन करण्यात आले. तरीही प्रतिसाद यथातथाच राहिला.

मात्र गेल्या दोन-तीन आठवडय़ांपासून करोनाच्या रुग्णसंख्येत मोठय़ा प्रमाणात भर पडू लागल्याने लसीकरणासाठी लोक केंद्रापर्यंत धावत जात आहेत. या आठवडय़ात लसीकरण केंद्रावर लांबलचक रांगा लागल्या होत्या. जिल्ह्यत साडेपाच लाख पुरवठा करण्यात आला होता, असे जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी योगेश साळे यांनी सांगितले. १९ हजार लस उरल्या होत्या. त्या आज संबंधित केंद्रावर पाठवण्यात आल्या. त्या लोकांना देण्यात आल्या असून सायंकाळपासून जिल्ह्यत लस साठा संपला असल्याचे सूत्रांनी सांगितले. पुढील लस पुरवठा कधी होणार याची निश्चित माहिती नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.