प्रेमभावना व्यक्त करणारा १४ फेब्रुवारी हा ‘व्हॅलेंन्टाइन डे’ म्हणजे प्रेमीयुगलांनी गुलाब फूल हाती देण्याचा दिवस. देशातच नव्हे तर विदेशातही कृष्णा-पंचगंगा काठी फुललेला गुलाब प्रेमिकांच्या हाती असेल. आजच्या दिवसाची गरज लक्षात घेऊन शिरोळ तालुक्यातील श्रीवर्धन बायोटेकमधून तब्बल २० लाख गुलाब फुले पाठवण्यात आली आहेत. यातून प्रेमिकांची गुलाब फुलांची गरज पूर्ण होईल, तर भारताला परकीय चलनाची प्राप्ती.

जगभरात १४ फेब्रुवारी हा व्हेलेन्टाइन डे साजरा केला जातो. गुलाब फूल देऊन प्रेम व्यक्त करणाऱ्या या दिवसाची प्रेमी युगुल आतुरतेने वाट पाहात असतात. या दिवसाची गुलाब फुलांची गरज लक्षात घेऊन हरितगृह चालकही आपल्या बगिचामध्ये गुलाबाची योग्य प्रकारे वाढ व्हावी याकडे निगुतीने लक्ष पुरवत असतात.  माजी आमदार डॉ. सा. रे. पाटील यांनी कोंडिग्र,े ता. शिरोळ येथील फोंडय़ा माळावर श्रीवर्धन बायोटेकची मुहूर्तमेढ रोवली. आता येथे ११० एकरावर हरितगृहातील पुष्पशेती बहरली आहे. येथे उत्पादित झालेली गुलाब फुले सातासमुद्रापार रवाना झाली आहेत. व्हॅलेन्टाइन डे निमित्त येथील वीस लाख फुलांची बाजारात विक्री झाली आहे. त्यातील तब्बल बारा लाख फुले ही युरोप, ऑस्ट्रेलिया, आशिया खंडात विकली गेली आहेत, यामुळे देशाला मोठय़ प्रमाणात परकीय चलन मिळणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या अत्याधुनिक शेतीच्या संकल्पनेतून निर्यातक्षम फुलांचे उत्पादन केले जाते. व्हॅलेन्टाइन डे या दिवशी गुलाब फुलांची मोठी मागणी असल्याने तीन महिने अगोदरपासूनच गुलाब फुलांच्या उत्पादनासाठी श्रीवर्धनचे रमेश पाटील हे विशेष लक्ष देऊन असतात.

या प्रयत्नाचे फलित म्हणजे यंदा वीस लाख फुलांचे उत्पादन उच्चांकी झाले. त्यामध्ये नऊ लाख फुले ही लाल रंगाच्या गुलाबाची आहेत. उरलेली इतर विविध रंगांची आहेत. लंडन, ग्रीस, ऑस्ट्रेलिया, जपान यासह अन्य देशांमध्ये बारा लाख गुलाब परकीय बाजारपेठेत निर्यात करण्यात आले आहेत. कोंडिग्रेसारख्या खेडेगावातील गुलाब हा परकीय बाजारपेठेत विकला जातो.

अद्ययावत पुष्पशेती

याखेरीज देशातील दिल्ली, मुंबई, नागपूर, हैदराबाद, पुणे, जबलपूर, कोलकाता यांसारख्या महत्त्वाच्या महानगरांमधूनही गुलाबाला मोठी मागणी असते. गुलाबाची तोडणी केल्यापासून बाजारपेठेत जाईपर्यंत मोठय़ा प्रमाणात फुलांची काळजी घेतली जाते. ‘श्रीवर्धन’मध्ये अत्याधुनिक पद्धतीने या फूलशेतीचे उत्पादन हे आधुनिक शेतीला नवा आयाम मिळवून देणारे आहे. येथील अद्ययावत पुष्पशेतीचा फुललेला मळा पाहण्यासाठी विविध क्षेत्रांतील अभ्यास, जाणकार, जिज्ञासू मोठय़ा प्रमाणात येत असतात.