खत विक्रेते,  कागल येथील दुहेरी कर आकारणी, खर्चीवाला यंत्रमागधारक, बांधकाम कामगार अशा विविध प्रकारच्या मोर्चामुळे मंगळवारी जिल्हय़ातील वातावरण ढवळून निघाले. भीक मांगो आंदोलनांतर्गत आमदार हसन मुश्रीफ हे निधी संकलनासाठी रस्त्यावर उतरले होते.
कीटकनाशके, खतांची विक्री करण्यासाठी बी.एस्सी. अॅग्री प्रमाणपत्राची सक्ती करण्याचा केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात मंगळवारी जिल्हा बी-बियाणे, कीटकनाशक व खते व्यापारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. शासनाच्या या निर्णयाचा फटका राज्यातील ५० हजार कृषी औषध विक्रेत्यांना बसणार आहे. हा निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चात संघटनेचे अध्यक्ष विनोद पाटील, उपाध्यक्ष विकास कदम, सचिव सुनील डुणूंग, खजिनदार अशोक श्रीश्रीमाळ यांच्यासह विक्रेते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
‘भीक मांगो’
कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कागल शहरात शासनाच्या दुहेरी कर वसुलीच्या विरोधात मंगळवारी ‘भीक मांगो’ आंदोलन करण्यात आले. आमदार हसन मुश्रीफ आणि त्यांचे कार्यकत्रे भिकेसाठी बंद पेटय़ा तसे कटोरे घेऊन भीक मागत होते. ‘कागल बंद’मुळे रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांकडे व स्टँड परिसरात प्रवाशांकडे भीक मागितली. व्यापारी वर्गाने आपली दुकाने पूर्णपणे बंद ठेवली होती. तहसीलदार कार्यालयावर मोर्चाने जाऊन जमलेली भिकेची रक्कम व निवेदन नायब तहसीलदार सरस्वती िशदे-पाटील यांच्याकडे देण्यात आले.
वाळू लिलावाचे स्वामित्वधन ठेकेदाराने आधीच भरलेले असताना वाहतुकीवेळी पुन्हा वसुली केली जाते. ट्रक जप्त करणे, लाखाचा दंड करणे यामुळे संबंधित व्यावसायिक वैतागले आहेत. कुंभार समाजास माती वाहतुकीसाठी कर सवलत असताना या सर्वाकडून स्वामित्वधन वसूल केले जाते, ते तात्काळ थांबवावे, अशी मागणी करत आंदोलकांनी भीक मागितली. नाहक त्रास तत्काळ थांबवावा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. शिवानंद माळी, संजय हेगडे, लॉरी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुभाष जाधव आदींची भाषणे झाली.
 बांधकाम कामगार
बांधकाम कामगारांच्या मागण्यांबाबत इचलकरंजी येथील सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. या ठिकाणी सुरू असलेली वशिलेबाजी थांबवून कार्यालयीन कामकाजात सुधारणा आणावी यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने सहायक कामगार आयुक्त कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आले.
इचलकरंजी येथील येथील सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडून कामगारांना न्याय मिळत नसल्याने महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने कॉ. हणमंत लोहार, मारुती आजगेकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. प्रमुख मार्गावरून मोर्चा सहायक कामगार आयुक्त कार्यालयावर आला. पण कोणीच अधिकारी उपस्थित नसल्याने कार्यालयाच्या दारातच कामगारांनी ठिय्या मारून जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने शॉप इन्स्पेक्टर कोळी यांना निवेदन सादर करण्यात आले. कामगारांना शासन निर्णयाप्रमाणे पाच हजार रुपये अनुदान मिळावे, कार्यालयातील वशिलेबाजी बंद करून समान न्याय मिळावा, घरकुलासाठी पाच लाख रुपये अनुदान मिळावे, मेडिक्लेम योजना सुरू करावी यासह विविध मागण्या नमूद केल्या आहेत. मोर्चात चंद्रकांत नरगद्रे, केरबा कांबळे, अशोक गोपलकर, सादिक शेख, आदम मुल्ला, कुमार सोनवले, दादासो िशदे, महेश लोहार यांच्यासह कामगार सहभागी झाले होते.
 खर्चीवाला यंत्रमागधारक
खर्चीवाल्या यंत्रमागधारकांना मजुरीवाढ मिळावी या मागणीसाठी इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनच्या नेतृत्वाखाली मंगळवारी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शिष्टमंडळाच्या वतीने प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांना निवेदन देण्यात आले असता त्यांनी या प्रश्नी संयुक्त बठक घेण्याचे आश्वासन दिले. तर तोडगा न निघाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा खर्चीवाल्या यंत्रमागधारकांनी दिला.
गेल्या तीन वर्षांपासून खर्चीवाल्या यंत्रमागधारकांना मजुरीवाढ मिळालेली नाही. या संदर्भात पॉवरलूम क्लॉथ अँड यार्न र्मचट्स असोसिएशनशी वारंवार पत्रव्यवहार करूनही त्यांच्याकडून ट्रेडिंगधारकांकडून केराची टोपली दाखवली गेली. त्यामुळे खर्चीवाला यंत्रमागधारक आíथक कचाटय़ात सापडला आहे. या संदर्भात गत आठवडय़ात पॉवरलूम असोसिएशन येथे झालेल्या मेळाव्यात चच्रेला न बोलावल्यास मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार पॉवरलूम असोसिएशनच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाली. प्रमुख मार्गावरून फिरून मोर्चा प्रांत कार्यालय येथे आला. या ठिकाणी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी, चंद्रकांत पाटील, नारायण दुरुगडे, कॉ. सदा मलाबादे, धर्मराज जाधव, वसंत तांबे, दीपक पाटील, विजय पोवळे, सोमा वाळकुंजे आदींची भाषणे झाली. बऱ्याच वर्षांनी काढण्यात आलेल्या या खर्चीवाल्या यंत्रमागधारकांच्या आंदोलनात इचलकरंजीसह शहापूर, रेंदाळ, तारदाळ, कोरोची, रेंदाळ, हुपरी, अब्दुललाट, वडगाव, कुरुंदवाड परिसरातील यंत्रमागधारक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.