पिके वाचवायची की पिण्याचे पाणी उपलब्ध करायचे? प्रशासनापुढचा पेच
पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे ग्रामीण भागातील लोकांना भटकंती करावी लागत असताना उभी पिके वाळून जाण्याच्या भीतीने शेतकऱ्यांकडून बंधाऱ्याला बरगे घालण्याचा प्रकार होत आहे. उपसाबंदी झाल्यामुळे कृष्णा-वारणा नदीकाठावरील बळीराजाच्या तोंडचे पाणी पळून गेले आहे. पिके वाचवून शेतकऱ्यास सावरायचे की पाण्यासाठी रानोमाळ फिरणाऱ्या बायाबापडय़ांचा त्रास कमी करायचा, असा पेच प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.
पाणी समस्येची तीव्रता दोन्ही नद्यांच्या काठावरील लोकांना जाणवत आहे. शिरोळ तालुक्यात पहिल्यांदाच वारणा व कृष्णा नद्यांतील पाणी उपसा बंदी केल्यामुळे पाणीटंचाईची दाहकता जाणवत आहे. २४ एप्रिलपासून पाणी उपसा बंदीमुळे भाजीपाला पिकाचे नियोजन कोलमडले आहे. मेमध्ये आणखी दोन टप्प्यांत पाणी उपसा बंदी होणार आहे. या पाश्र्वभूमीवर सांगली जिल्ह्य़ातील काही गावांना बंदीकाळात दररोज दोन तास उपसा परवानगी दिल्याने येथील शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे. सांगली जिल्ह्य़ाला वेगळा नियम आणि कोल्हापूरला वेगळा नियम असा दुजाभाव का, असा सवाल शेतकरी करू लागले आहेत.
जिल्ह्य़ाच्या दक्षिण भागातील चिकोत्रा नदी खोऱ्यातही पाण्याच्या दाहकतेने पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या वर्षी हे धरण केवळ ४६ टक्केच भरले. त्यामुळे प्रशासनाने १० जानेवारीपासून चिकोत्रा नदीतून शेतीसाठी पाणी उपसा बंद करण्याचा निर्णय घेतला. ५ ते ८ एप्रिल या कालावधीत ही उपसाबंदी शिथिल करून शेतकऱ्यांना पाणी उपसा करण्यासाठी परवानगी दिली होती. त्याचा लाभ राजकीय वरदहस्त असणारे शेतकरी घेऊ लागले. उपसा बंदी झुगारून अवैध पाणी उपसा होऊ लागला. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ नये यासाठी उपसाबंदी उठवलेल्या कालावधीत उपसा करून सहकार्य करण्याचे आवाहन पाटबंधारे विभाग करत आहे. पंचगंगा नदीवरील तेरवाड बंधाऱ्याचे बरगे पाटबंधारे विभागाने काढल्याने स्वाभिमानी युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बरगे घातले आहेत. तरीही पाण्याचा मोठय़ा प्रमाणात विसर्ग होत असल्याने अधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. कोरडय़ा पडलेल्या पंचगंगा नदीत धरणातून पाणी सोडल्याने शिरोळ तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळाला.
तेरवाड बंधाऱ्याच्या उत्तरेकडील शिरोळ बंधाऱ्यापर्यंतच्या गावांना पाणी मिळावे, यासाठी पाटबंधारे विभागाने या बंधाऱ्याचे सुमारे १४ दरवाजांचे बरगे काढले आहेत. बंधाऱ्यातून मोठय़ा प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असून, या बंधाऱ्यांतील पाण्यावर अवलंबून असलेल्या १० गावांतील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. ‘पाटबंधारे’च्या अधिकाऱ्यांनी बरगे घालून त्वरित गळती थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी युवा आघाडीच्या बंडू पाटील यांनी दिला आहे.