बॉयलरमधून बाहेर पडणाऱ्या राखेमुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने वसंतदादा साखर कारखाना तातडीने बंद करावा असा प्रस्ताव सांगलीच्या उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाने वरिष्ठ कार्यालयाकडे धाडला आहे. कारखान्याचा गाळप हंगाम चालू झाल्यापासून बॉयलरमधून राख बाहेर पडत आहे. यामुळे श्वसनविकाराबरोबरच अर्धवट जळालेल्या राखेचे निखारे अंगावर पडून भाजण्याचे प्रकार कारखान्याच्या आसपास घडत आहेत. उघडय़ा खिडकीतून वाऱ्यासोबत स्वयंपाकघरातही राख येत असल्याने गंभीर परिणाम कारखान्याच्या ५ किलोमीटर परिसरातील नागरिकांना भोगावे लागत आहेत.
वसंतदादा साखर कारखान्याची स्थापना सुमारे ४० वर्षांपूर्वी झाली असून कारखान्याचा लौकिक आशिया खंडात सर्वात मोठा कारखाना असा होता. मात्र गेल्या काही वर्षांत कर्जाच्या बोजाखाली कारखाना सुरू होतो की नाही अशी अवस्था निर्माण झाली होती. मात्र गेल्या दोन वर्षांपासून अनंत अडचणीवर मात करीत कारखान्याचे गाळप सुरू आहे.
जिल्ह्यातील काही कारखाने अद्याप एफआरपीच्या वादावर काय तोडगा निघतो याकडे लक्ष ठेवून बंद असताना वसंतदादा कारखान्याने सर्वात प्रथम गाळप सुरू केले आहे. कारखान्याचे आठ बॉयलर असून कारखान्याची उभारणी झाली तेव्हापासून हे कार्यान्वित आहेत. या बॉयलरमध्ये राख प्रतिबंधक यंत्रणा नसल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही यंत्रणा बसविल्याशिवाय गाळप हंगाम सुरू करू नये, असे निर्देश दिले होते.
गतवर्षी आठपकी तीन बॉयलरसाठी राख प्रतिरोधक यंत्रणा बसविण्यात आली. मात्र यामुळे जुने बॉयलर अपेक्षित वाफेचा दाब देण्यास असमर्थ ठरू लागल्याने बसविण्यात आलेली यंत्रणा बंद करण्यात आली. राख प्रतिरोधक यंत्रणा बंद ठेवून गाळप करण्यात येत आहे. यामुळे परिसरात गाळप हंगामाच्या कालावधीत बॉयलरमधून राख बाहेर फेकली जात आहे. ही राख बऱ्याचवेळी अर्धवट जळालेल्या अवस्थेतच बाहेर पडत असल्याने भाजण्याचे प्रकारही घडत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. तसेच हवेत राखेचे प्रमाण जास्त असल्याने श्वसनविकाराचे त्रासही वाढलेले आहेत.
बॉयलरमधून बाहेर पडणाऱ्या राखेचे बाल्कनी, अंगण, रस्ता अशा सर्व उघडय़ा जागेवर थर साचत असून यामुळे अस्वच्छतेचे प्रमाण वाढले आहे. घराची खिडकी उघडली की राखेचे कण जेवणाच्या ताटापर्यंत पोहोचत असल्याच्या तक्रारी आहेत. कपडे काळे होण्याचे तर नित्याचेच बनले आहे.
याबाबत काही नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रारी केल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत तत्काळ कारवाईचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिल्यानंतर मंडळाचे उपप्रादेशिक संचालक िलबाजी भड यांनी कारखाना कार्यस्थळावर जाऊन वस्तुस्थितीची पाहणी केली. यंत्रणा जुनाट झाल्याने बॉयलर बदल केल्याशिवाय या प्रश्नावर उपाय निघू शकत नसल्याचे स्पष्ट झाल्याने कारखाना तत्काळ बंद करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक संचालकांकडे धाडण्यात आला असल्याची माहिती शनिवारी कार्यालयातून मिळाली.