सहावा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ८ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. यंदा ‘शून्य कचरा’ हे महोत्सवाचे घोषवाक्य आहे. त्याअंतर्गत पराग केमकर, राजा उपळेकर, ग्रीन गार्ड्स या संस्थेला वसुंधरा मित्र व आदर्श सहेली मंच, युवक मित्रमंडळ राजारामपुरी व कोल्हापूर अग्निशामक दल यांचा ‘वसुंधरा गौरव’ने सन्मान करण्यात येणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुमारे ४० लघुपट दाखविण्यात येणार आहेत, अशी माहिती कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी व ‘किर्लोस्कर’चे सरव्यवस्थापक विश्वास पाटील यांनी दिली.
ते म्हणाले, महोत्सवाचे उद्घाटन शाहू स्मारक भवनमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निवृत्त सदस्य सचिव डॉ. दिलीप बोरालकर यांच्या हस्ते व आर. आर. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली होईल.
दि. ९ ऑक्टोबरला ‘वसुंधरा मित्र’ व ‘वसुंधरा गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, तर दि. ११ ऑक्टोबरच्या सांगता समारंभात ‘वसुंधरा सन्मान’ हा पुरस्कार प्रदान केला जाईल.
पराग केमकर हे गेल्या सात वर्षांपासून ते कचरा व टाकाऊ अन्नापासून बायोगॅस तयार करून त्यांचा वापर करतात व प्रशिक्षणही देतात. सौरचुल, सौरकंदिल, शेतातील धान्य वाळवणी यंत्र यांची प्रात्यक्षिके देतात.
राजा उपळेकर हे छायाचित्रकार असून त्यांनी रंकाळा परिसरात कासव बचाव, सर्प बचाव अशा मोहिमेत सहभाग घेतला आहे. युवक मित्र मंडळाने ‘लाभांकूर’ हा प्रकल्प राबवून ’शून्य कचरा’ ही संकल्पना रूजवली आहे. माणसासह मुक्या प्राण्यांच्याही मदतीला धावणाऱ्या ‘अग्निशमन दला’ने गेल्या तीन वर्षांत ७५० हून अधिक प्राणी, पक्ष्यांना जीवदान दिले आहे.
महोत्सव निशुल्क असून त्यासाठी १ तारखेपासून कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी, पहिला मजला, शाहू स्टेडियम येथे नावनोंदणी करण्यात येईल, तरी इच्छुकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.