टाळेबंदी जाहीर झाल्यामुळे त्याचा शेतीतील आर्थिक व्यवहारावर विपरित परिणाम दिसत आहे. शेतामध्ये भाजीपाला, फुले, फळे, काढायला आली असून त्याला खरेदीदार कमी दर देत असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. दुसरीकडे, शहरांमध्ये पुरेसा शेतमालाचा पुरेसा पुरवठा होत असला तरी भाजीपाला, फळ, धान्य यांचे दर मात्र वाढलेले असल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागली आहे.

टाळेबंदीमुळे लोकांच्या व्यवहारावर निर्बंध घालण्यात आले आहेत. याचा शेतकऱ्यांच्या आणि शेती व्यवहारावर परिणाम होत आहे. शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला, फुले, फळे, तयार झाली आहेत. त्याची तोडणी- वेचणी करण्यासाठी मजूर मिळत नाहीत. मजुरांना शेतामध्ये कामाला जाण्यासाठी परवानगी मिळवताना नाकीनऊ येत आहे. उपलब्ध शेतमजुरांसह शेतकरी सहकुटुंब शेतमाल काढून ठेवत असले तरी खरेदीसाठी त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरवत आहेत. शेतमाल जितक्या प्रमाणात काढला जातो त्याहून कमी प्रमाणात खरेदी केली जाते. दर सुद्धा पाडून मागितला जात आहे.

शेतमालाची कवडीमोलाने विक्री

मजले येथील शेतकरी नेमीनाथ पाटील यांनी त्यांच्या अडचणी शुक्रवारी लोकसत्ताशी बोलताना कथन केल्या. ते म्हणाले, आम्ही शेतात केळीचे उत्पादन घेतले आहे. यंदा १८ टन केळी उत्पादन अपेक्षित आहे. त्यातील चार टन केळीची विक्री झाली आहे. बाकीची केळी पक्व होत आहेत. तीन आठवडय़ापूर्वी प्रतिटन दहा ते अकरा हजार रुपये असा दर मिळत होता. आता मात्र पाच हजार रुपये मिळणे मुश्कील झाले आहे. केळी जनावरांना खायला घालण्यावाचून पर्याय राहिला नाही.  सुकुमार पाटील या कलिंगडाची उत्पादक शेतकऱ्याचा असाच अनुभव आहे. ‘दहा हजार रुपये टन प्रमाणे महिन्यापूर्वी विकले जाणारे कलिंगड आता निम्म्या किमतीलाही घेण्यासाठी कोणी येत नाही. यामुळे जिल्हा कृषी विभागाकडून परवाना घेऊन गावोगावी पन्नास-साठ रुपये दराने कलिंगडच किरकोळ विक्री सुरू केली आहे. बऱ्याच गावांमध्ये विक्रीसाठी येण्यास मज्जाव केला जात आहे, असे त्यांनी सांगितले.  कागल तालुक्यातील माळी कुटुंबीयांनी दोन एकरातील ३० टन ढबू मिरची गावकऱ्यांना मोफत देऊन टाकली, तर अनेक गावांमध्ये टोमॅटो विकला जात नसल्याने शेतातच फेकला जात आहे. शेतकऱ्यांवर आर्थिक कुऱ्हाड कोसळली आहे.

ग्राहकाच्या खिशाला कात्री

दुसरीकडे, शहरातील चित्र मात्र भलतेच आहे. पुरेशा प्रमाणात शेतमाल पुरवठा होत असला तरी दर २५ ते ३० टक्के वाढले आहेत. तीन दिवसांपूर्वी ८० रुपये किलो असणारा शेंगदाणा आता १२० रुपयाला मिळू लागला आहे. अशाप्रकारे अन्यही अन्नधान्याच्या दरातही वाढ होताना दिसत आहे. बाजारातील या व्यवहारात थेट शेतात जाऊन घाऊक खरेदी करणारे, दलालांचे फावत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ग्राहकांकडून होत आहे.

प्रशासनाचा दक्षतेचा दावा

याबाबत कोल्हापूर जिल्ह्यचे कृषी अधीक्षक ज्ञानदेव वाकुरे यांनी सांगितले की ‘अन्नधान्य, भाजीपाला याचा तुटवडा नाही. बाजार समितीतील याबाबतची आकडेवारी पाहिली तर ग्राहकांना पुरेसा पुरवठा आहे. शेतकऱ्यांना वाहतुकीची अडचण येऊ नये यासाठी तत्काळ परवाने दिले जात आहेत. शेतकरी, शेतकरी मंडळ यांच्यावतीने शिवार ते बाजार अशी विक्री करणाऱ्यांनाही परवाने दिले आहेत. ग्राहक व शेतकरी यांच्यात दराचा निर्णय ठरत असतो. त्यामध्ये थेट हस्तक्षेप होत नाही. कृषी विभागाकडून कोणत्याही प्रकारची अडचण शेतकऱ्यांना येणार नाही याची काळजी घेतली जात आहे’ असे त्यांनी स्पष्ट केले.

टाळेबंदीमुळे शेती व्यवसायाचे चR  विस्कळीत झाले आहे. कागल तालुक्यातील चंद्रकांत माळी यांनी ३० टन ढबू मिरची गावकऱ्यांना मोफत वाटली.