|| दयानंद लिपारे

विधानसभा निवणुकीनंतर राज्यात सर्वाधिक जागा पटकावलेल्या भाजप आणि शिवसेना यांच्यात सत्तास्थापनेसाठी चढाओढ सुरू असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या जिल्ह्य़ात भाजपला दोन्ही जागा गमवाव्या लागल्याने आणि शिवसेनेचे संख्याबळ उतरणीला लागल्याने वादाला तोंड फुटले आहे. महायुतीच्या अपयशावरून चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांच्यावर खापर फोडले आहे. ‘भाजपमुक्त कोल्हापूर’ला शिवसेना जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. तर मंडलिक यांनी पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे. कोल्हापुरात आरोप-प्रत्यारोपाचे फटाके वाजू लागले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गडाला हादरे देत शिवसेनेने ६ तर भाजपने २ ठिकाणी विजय मिळवला होता.

चंद्रकांतदादा लक्ष्य

चंद्रकांत पाटील यांनी आरोपाचे एक बोट मंडलिक यांच्याकडे केल्यावर मंडलिक यांनी चंद्रकांतदादांना निशाणा केला आहे. पाटील यांनी सोयीचे राजकारण कसे केले यावरून वाद रंगला आहे. युती धर्म पाळण्याची भाषा करणारे चंद्रकांतदादा यांनी लोकसभेला युतीच्या विरोधात भूमिका घेणारे भाजप आमदार अमल महाडिक,त्यांच्या पत्नी भाजपच्या जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महडिक यांना युती धर्माची आठवण का करून दिली नाही. संजय घाटगे यांच्याविरोधात लढणारे समरजितसिंह घाटगे यांच्यावर पक्ष विरोधी कारवाई का केली नाही? असा सवाल मंडलिक यांनी विचारला आहे. चंदगडमध्ये भाजप पदाधिकारी उघडपणे अपक्ष शिवाजी पाटलांच्या प्रचारात होते. तर राज्याच्या सत्तेत भाजपला पाठिंबा देणाऱ्या जनसुराज्य शक्ती पक्षाच्या माध्यमातून शिवसेनेच्या तीन आमदारांसह चार उमेदवारांविरोधात लढलेले उमेदवार नेमके भाजपचेच कसे होते. याचा अर्थ भाजपच्या ‘ब संघाच्या माध्यमातून उभ्या केलेल्या उमेदवारांमुळे शिवसेनेचे चार उमेदवार पराभूत झाले, असा केवळ मंडलिक यांचाच नव्हे तर जिल्ह्य़ातील शिवसैनिकांचा तक्रारीचा सूर आहे. विधानसभा निवडणुकीने जिल्ह्य़ात महायुतीची पीछेहाट झाली असली तरी आता मने कधी जुळणार हा प्रश्न आहे.

कुरघोडय़ा महायुतीच्या अंगलट : भाजपला प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्य़ात भाजपमुक्त होण्याची वेळ आली. तर शिवसेनेच्या पाच गडांवरील भगवा उतरून विरोधकांचे निशाण लागले. केवळ एक जागा जिंकता आली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सांघिक यशाने महायुतीच्या ठिकऱ्या उडाल्या. चंद्रकांत पाटील यांनी या पराभवाला सर्वस्वी मंडलिक जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. तो खोडून काढत मंडलिक यांनी पाटील यांनी जनसुराज्य शक्ती पक्ष या भाजपच्या माध्यमातून उभे केलेल्या उमेदवारांमुळे महायुतीची घसरण झाल्याचा प्रत्यारोप केला आहे. दोन्ही पक्षांतून झालेले सोयरिकीचे राजकारण महायुतीच्या अवनतीला जबाबदार  आहे.

मंडलिकांची पैरा फेडण्याची नीती : लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिक यांनी  पावणेतीन लाख मतांनी विजय मिळवला. याला शिवसेना-भाजपची  ताकद कारणीभूत ठरली, तशीच त्यांना उभय काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण साथ मिळाली. राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या विरोधातील भूमिका कायम ठेवत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी ‘आमचं ठरलंय’ म्हणत मंडलिकांचा उघड प्रचार केला. तर राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी कागल तालुक्यातील सेनेच्या या उमेदवाराला आतून मदत केली. विधानसभा निवणुकीची वेळ आल्यावर मंडलिक यांनी फैरा फेडण्याची भूमिका वठवली.