दयानंद लिपारे

संभाव्य स्थितीबद्दल आराखडय़ांच्या सूचना

कोल्हापूर :  महापुराच्या तीव्रतेनुसार कोल्हापूर जिल्ह्यतील गावपातळीपर्यंत नियोजन केले जाणार आहे. दरवर्षी उद्भवणारी पूरस्थिती, अधिक पूरस्थिती आणि सण २०१९ साठी विक्राळ महापूर स्थिती अशा तीन टप्प्यातील नियोजन गाव स्तरावर केले जाणार आहे. याबाबत आपत्ती व्यवस्थापन विभागाने गावपातळीपर्यंत आराखडे सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यत दरवर्षी पूरस्थिती उद्भवते. अनेकदा महापुराचा तडाखा बसतो. दोन वर्षांपूर्वी आलेल्या अक्राळविक्राळ महापुरामुळे कोल्हापूर जिल्हा नदीकडचा भाग उद्ध्वस्त झाला होता. यामुळे दरवर्षी होणारी ही परिस्थिती लक्षात घेऊन शासकीय पातळीवर उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार यावर्षी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने वेगळ्या आणि सूक्ष्म प्रकारचे नियोजन करण्याचे ठरवले आहे. हे नियोजन ग्राम पातळीवर असणार असून त्यामध्ये बारीकसारीक घटकांचा विचार केला जाणार आहे.

तिहेरी टप्प्यात नियोजन

यावर्षीची संभाव्य महापूर परिस्थिती लक्षात घेऊन गेल्या आठवडय़ात जिल्हाधिकारी डॉ. दौलत देसाई यांनी प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्यासमवेत एक प्राथमिक बैठक घेऊन त्यांना महापुराचा आराखडा सादर करण्याच्या सूचना केल्या. तर याही पुढे जात आता आणखी सूक्ष्म नियोजन सुरू आहे. त्यानुसार यंदा तसेच पुढील काळातही सामान्य पूरस्थिती, अधिक पूरस्थिती आणि २०१९ सालची अक्राळविक्राळ महापूर स्थिती अशा तिहेरी टप्प्यामध्ये महापुराचे नियोजन केले जाणार आहे. तिन्ही पैकी कोणतीही पूरस्थिती निर्माण झाल्यास त्याचा मुकाबला कसा करायचा याचे नियोजन त्यामध्ये असणार आहे. त्यासाठी नदीकाठच्या प्रत्येक गावांना आराखडा सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.

करोना संसर्गाची दक्षता

गतवर्षीपेक्षा करोना संसर्ग तीव्रता यावर्षी अधिकच वाढली आहे. त्यामुळे करोनाचा विचार महापुराच्या अंगाने केला जात आहे. त्यादृष्टीने महापुरात लोकांचे स्थलांतर केल्यानंतर निवारागृहात राहणाऱ्या लोकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. बचाव पथकातील स्वयंसेवकांच्या लसीकरणाला प्राधान्य दिले जाणार आहे. महापूरस्थिती लक्षात घेऊन औषध, धान्य व अन्य अत्यावश्यक साठाही करण्याच्या दृष्टीने नियोजन आहे, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी शनिवारी ‘लोकसत्ता’ला सांगितले.