बाजारात दोन रुपये दराने मिळणारे ‘अर्सनिक अल्बम ३०’ हे औषध ग्रामविकास विभागाने २३ रुपयांना खरेदी केल्याचा आरोप करून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जनतेची दिशाभूल केली आहे, अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. इतकच नव्हे तर चंद्रकांतदादांनी, अर्सेनिक अल्बमच्या गोळ्या दोन रुपयांना मिळवून द्याव्यात, असे आव्हान मुश्रीफ यांनी चंद्रकांतदादांना दिले आहे. यामुळे पाटील – मुश्रीफ यांच्यातील औषध खरेदीतील वादाला गुरुवारी नवा कंगोरा लाभला आहे. याबाबत मुश्रीफ यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना सविस्तर पत्र पाठवून औषध खरेदीचा सविस्तर तपशील दिला आहे. याशिवाय, स्वस्त दरात औषध खरेदी होणार असेल तर तुमच्या सहकार्याने महाराष्ट्रातील सर्वच जिल्हा परिषदांना ते खरेदी करण्याच्या सूचना करू, असंही मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

करोनाच्या धोक्यापासून सुरक्षित राहण्यासाठी आयुष मंत्रालयाने रोग प्रतिबंधकारक शक्तीवाढविण्यासाठी ‘आर्सेनिक अल्बम -३०’ हे होमिओपॅथी औषध वापरण्याची शिफारस केली आहे. शहरी भागात महानगरपालिका, नगरपरिषदा, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून नागरिकांना मोफत औषध पुरवठा करण्यात येत आहे. राज्यातील ५ कोटी ग्रामीण जनतेसाठी हे औषध मोफत देण्याची मी घोषणा केली होती. अनेक उत्पादक हे औषध बाजारात घेऊन आले आहेत. त्यामुळे याबाबत निविदा मागवली. वित्तीय लिफाफा उघडण्यात असता दर खूपच जास्त असल्याने निविदा प्रक्रिया रद्द केली. त्यामुळे हे होमिओपॅथी औषध आणि आणि ‘संशमनोवटी’ आयुर्वेदिक औषध जिल्हा स्तरावर खरेदी करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली.

चंद्रकांत पाटील यांनी हे औषध ग्रामविकास विभागाने २३ रुपयांना खरेदी केल्याचा आरोप करून जनतेची दिशाभूल, माझी व शासनाची बदनामी केली आहे. चुकीची माहिती दिल्याबद्दल २४ तासात माफी मागण्यास त्यांना सांगितले पण त्याची कार्यवाही झालेली नाही. यापूर्वी मी चंद्रकांत दादांवर एक फौजदारी बदनामी दावा दाखल केला आहे. दुसरा फौजदारी दावा दाखल करण्याची वेळ आणू नये, असा इशारा मुश्रीफ यांनी दिला आहे.