07 December 2019

News Flash

सांगली-कोल्हापूर पूर्वपदाकडे!

स्वच्छता, साथरोग निर्मूलन युद्धपातळीवर

पुणे-बेंगळूरु महामार्गावरून सोमवारी अंशत: वाहतूक सुरू करण्यात आली. 

दयानंद लिपारे, दिगंबर शिंदे

गेला आठवडाभर दक्षिण महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्य़ांना वेठीस धरणाऱ्या महापुराचा विळखा आता झपाटय़ाने सैलावू लागला आहे. या दोन्ही शहरांच्या बहुतांश भागांतील पाणी सोमवारी मोठय़ा प्रमाणात ओसरत होते. दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्थेवर ताण आणणाऱ्या प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्य़ात २४ ऑगस्टपर्यंत बंदी आदेश जारी करण्यात आले असून, त्यावर विरोधकांनी टीका केली आहे.

पूरग्रस्त भागात आता स्वच्छता आणि साथरोग निर्मूलनाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दुसरीकडे स्थलांतरित पूरग्रस्तांसाठीचे मदतकार्य नियोजनबद्धरीत्या सुरू झाले असून शहरातील पिण्याचे पाणी-दूधपुरवठाही बऱ्याच अंशी सुधारला आहे. आठवडाभर बंद असलेला पुणे – बेंगळूरु महामार्ग सोमवारी अंशत: सुरू झाला आहे. त्यामुळे आठवडाभर ठप्प झालेले या दोन्ही शहरांचे जनजीवन आता पूर्वपदावर येऊ लागले आहे.

गेला आठवडाभर कोल्हापूर-सांगली जिल्ह्य़ात महापुराने कहर माजवला होता. कृष्णा-वारणेमुळे सांगली आणि पंचगंगेमुळे कोल्हापूर शहर आणि परिसरात महापूर आला होता. शुक्रवारपासून पुराचे पाणी ओसरू लागले. पावसानेही विश्रांती घेतल्याने मदतकार्याने कमालीचा वेग घेतला. सोमवारी या दोन्ही शहरांच्या बहुतांश भागांतील पाणी मोठय़ा प्रमाणात ओसरू लागल्याने आता प्रशासनापुढे पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचे आव्हान आहे.

सांगली शहरातील महापुराचे पाणी आज मोठय़ा प्रमाणात कमी होऊ लागले. शहरातील तासगाव मार्गावरील कॉलेज कॉर्नर, टिंबर एरिया परिसरासह आंबेडकर रोड, स्टेशन रोड आदी भागांतील पुराचे पाणी ओसरले आहे. या भागात स्वच्छता आणि रोगनिर्मूलन मोहीम युद्धपातळीवर राबवण्यात येत आहे. या कामात सांगली, कोल्हापूरसह सोलापूर, सातारा, पुणे, लातूर आदी महानगरपालिकांची पथके आणि यंत्रणा सहभागी झाल्या आहेत.

महापुराचे पाणी ओसरले तरी अनेक घरांपासून ते रस्त्यावर सर्वत्र काही फूट उंचीच्या गाळाचे थर आणि घाण आहे. रस्त्यावरील हा गाळ-चिखल टँकरच्या पाण्याने धुऊन काढण्यात येत असून त्यावर जंतुनाशके आणि धूर फवारणी करण्यात येत आहे. या कामात तसेच अनेकांच्या घरांमध्ये साचलेले पाणी-गाळ काढण्याच्या कामात स्वयंसेवी संस्थांचेही शेकडो कार्यकर्ते सहभाग देत आहेत.

तात्पुरत्या मदत-निवारा शिबिरांसह शहरात जागोजागी वैद्यकीय उपचार आणि मदत केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. मदतकार्यात शासकीय यंत्रणा, आयएमए, सोलापूर वैद्यकीय महाविद्यालय आणि दोन्ही जिल्ह्य़ांसह सातारा-सोलापुरातील डॉक्टर सहभागी झाले आहेत. केमिस्ट असोसिएशनने लागणारी सर्व औषधे विनामूल्य उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे.

दरम्यान, सांगली आणि कोल्हापूर या दोन्ही शहरांच्या बसस्थानकांतील पाणीही सोमवारी ओसरल्याने शहर आणि शहराबाहेरील प्रवासी वाहतूक काही प्रमाणात सुरू झाली आहे. शहरातील पाणीपुरवठा आणि दूधपुरवठाही बऱ्याच अंशी सुधारला आहे. शहरात भाजीपालाही  येऊ लागला आहे.

कोल्हापुरात बंदी आदेश जारी

महापुरामुळे विस्कळीत झालेले जनजीवन सावरण्यात प्रशासकीय यंत्रणा व्यग्र आहे. मदतकार्य सुरळीत राहावे, बघ्यांची वा समाजकंटकांची काही अडचण येऊनये म्हणून कोल्हापूर जिल्ह्य़ात २४ ऑगस्टपर्यंत बंदी आदेश जारी करण्यात आले असल्याची माहिती कोल्हापूरचे अपर जिल्हादंडाधिकारी संजय शिंदे यांनी सोमवारी दिली. काही असंतुष्ट गट गोंधळ घालण्याची शक्यता असल्याने तसेच बकरी ईद, स्वातंत्र्य दिन, दहीहंडी आदी सण-उत्सवांच्या काळात समाजकंटकांनी गोंधळ घालूनये म्हणून कोल्हापूर जिल्ह्य़ात बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. या काळात अनपेक्षित घटना, उपोषण, मोर्चे, आंदोलने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही अनपेक्षित घटना घडल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता असल्याने बंदी आदेश जारी करण्यात येत असल्याचे प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

बंदी आदेशावर काँग्रेसची टीका

गेल्या आठवडय़ापासून पुराच्या विळख्यात अडकलेल्या जनतेला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यास शासकीय यंत्रणा अपयशी ठरली असून, त्याविरोधात कुणी आवाज उठवू नये आणि पूरग्रस्तांचा रोष दाबून टाकण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्य़ात बंदी आदेश लागू करण्यात आल्याचा आरोप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

First Published on August 13, 2019 2:09 am

Web Title: water in sangli kolhapur areas was draining abn 97
Just Now!
X