कोल्हापूर जिल्ह्यला पावसाने झोडपले

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यला बुधवारी पावसाने झोडपून काढले. जिल्ह्यच्या सर्व भागात जोरदार पाऊस पडला. कोल्हापुरातील पंचगंगा नदीचे पाणी दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडले. जिल्ह्यतील ३७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यत पुढील चार दिवस अति पर्जन्यवृष्टी होणार असल्याचा इशारा वेधशाळेने दिला होता. वेधशाळेच्या अंदाजानुसार आज जिल्ह्यत सर्वच भागात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. गगनबावडा १००, भुदरगड ८५ , राधानगरी ७२ मिली या तालुक्यात सायंकाळी चार पर्यंत सर्वाधिक पाऊस पडला होता. जिल्ह्यतील पंचगंगा, भोगावती, तुळशी, कुंभी, कासारी, वेदगंगा, दूधगंगा, कडवी या नदीवरील ३७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीचे पाणी या मान्सून मध्ये दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडले आहे. येथील पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाराची पाणीपातळी ३१ फूट ९ इंच इतकी होती. इशारा पातळी ३९ फूट असल्याने प्रशासन सावध झाले आहे.

जनजीवन विस्कळीत

मुसळधार पावसामुळे आज जनजीवन विस्कळीत झाले. वाहनधारकांना पावसापासून बचाव करण्यासाठी रेनकोट घालून प्रवास करावा लागला.

खराब रस्ते आणि अनेक ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे वाहने चालवणे मुश्किल झाले होते. झाडे पडण्याचा आणि विद्युत खंडित होण्याचे प्रकार घडल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला.