14 October 2019

News Flash

पाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर चालविल्या जाणार

पाणीपुरवठा योजना सुरळीत व व्यवस्थित चालाव्यात, यासाठी त्या सौरऊर्जेवर चालवल्या जाणार आहेत.

सदाभाऊ खोत (संग्रहित छायाचित्र)

पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची घोषणा

पाणीपुरवठा योजना सुरळीत व व्यवस्थित चालाव्यात, यासाठी त्या सौरऊर्जेवर चालवल्या जाणार आहेत. जोतिबा व पन्हाळगडाच्या पाण्यासाठी पहिली पाणीपुरवठा योजना अशाप्रकारे राबवून महाराष्ट्र राज्यात एक आदर्श निर्माण करणार आहे, अशी घोषणा महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा, स्वच्छता व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली. पन्हाळा व शाहुवाडी तालुक्यातील गावांना नवीन पाणीपुरवठा योजनांसाठी १० कोटी रुपयांचा निधी देण्याचेही त्यांनी मान्य केले.

पन्हाळा येथे आयोजित शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत पन्हाळा तालुकास्तरीय आढावा बैठक प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री विनय कोरे होते.

यावेळी मंत्री खोत पुढे म्हणाले की, पन्हाळा हा महाराष्ट्र राज्याला प्रेरणा देणारा गड आहे. येथे छत्रपती शिवाजी महाराज यांनी वास्तव्य केले आहे. त्यामुळे पन्हाळगडाला महत्त्व आल्याने पन्हाळय़ाच्या जीर्ण झालेल्या पाणीयोजनेला सहा महिने काय तर सहा वर्षे मुदतवाढ सरकारकडून देण्यास आपण प्रयत्नशील आहे.

पन्हाळा नगरपरिषद व जोतिबा (वाडी रत्नागिरी) ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा योजना अपुऱ्या पडत आहेत. त्यांची वीज बिलेही मोठय़ा प्रमाणात येत आहेत.

यावर कायम स्वरुपी तोडगा काढण्यासाठी जोतिबा देवस्थानच्या जमिनीवर सौरप्रकल्प उभारून या दोन्ही पाणीपुरवठा योजनांना वीजपुरवठा करणाऱ्या पथदर्शी प्रकल्पासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाहीही मंत्री खोत यांनी दिली.

विनय कोरे म्हणाले, पन्हाळा तालुक्यातील पेयजेल योजना भौगोलिक गरजेनुसार होणे अपेक्षित आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना सुरु केली असून या योजनेत अजून सुसूत्रता यावी व पात्र कोणताही शेतकरी वंचित राहू नये. याची दक्षता घ्यावी.

राजकीय मतभेदाचे दर्शन

माजी आमदार विनय कोरे उपस्थित राहिल्याने त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी आमदार सत्यजित पाटील हे अनुपस्थित राहिले. शासकीय कार्यक्रम असल्याने या कार्यक्रमास पन्हाळा मतदारसंघाचे सत्यजित पाटील व करवीरचे चंद्रदीप नरके हे दोन्ही शिवसेनेचे आमदार उपस्थित राहतील, असे वाटत होते. पण  हा कार्यक्रम राजकीयदृष्टय़ा जनसुराज्य शक्ती पक्षाचाच असल्याचे चित्र स्पष्ट झाल्याने व पन्हाळा पंचायत समितीच्या सभापती यांनी आमदारांना आमंत्रीतच केले नसल्याचे कारण पुढे करत या कार्यक्रमाकडे आमदारांनी पाठ फिरवली. परिणामी हा कार्यक्रम नेमका शासकीय की जनसुराज्य शक्ती पक्षाचा याच्या चच्रेला तोंड फुटले.

First Published on January 22, 2018 2:42 am

Web Title: water supply schemes will be run on solar power say sadabhau khot