आमची ओळख दादागिरी, मारामारीची आहे. पण आम्ही हे करतो ते मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठीच. त्यामुळे, आमच्या नादाला लागू नका. अन्यथा सत्तेच्या ‘दादा’गिरीने शिवसेना संपवण्याची सुपारी घेतलेले आणखी कोण ‘दादा’ असतील तर ते सगळे जातील, असा शिवसेनेला साजेसा दांडगट इशारा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे झालेल्या शिवसेना मेळाव्यात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना नाव न घेता लगावला.

शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वतीने कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या एकतिसाव्या वर्धापनदिनानिमित्त जेष्ठ शिवसनिकांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. या वेळी मंत्री पाटील अध्यक्षपदावरून बोलताना शिवसेनेचा विस्तार करताना कोण आडवा येईल त्याची जिरवा, त्याच वेळी  शिवसेनेशी प्रामाणिक राहा, असे आवाहन शिवसनिकांना केले. शिवचरित्र व्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत केशवराव भोसले नाटय़गृहात मेळावा झाला.

राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणात सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या भाजपवर हल्ला चढवला. ते म्हणाले,  राज्यात व केंद्रात शिवसेना-भाजपा युतीची सत्ता आहे. तथापि  काँग्रेसच्या सत्ताकाळात त्यांनी जेवढा त्रास शिवसेनेला दिला नसेल, तेवढा त्रास आता भाजपाकडून दिला जात आहे. पशाच्या जीवावर शिवसेनेला कोंडीत पकडण्याचे जे धोरण सुरू आहे ते कदापिही यशस्वी होणार नाही. शिवसेना संपवण्याची सुपारी घेणारे ‘दादा’ शिवसनिक तुम्हालाही संपवतील. बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे भाजपची महाराष्ट्राला ओळख झाली. मात्र आता त्यांना सत्तेची मस्ती आली. पशाच्या जोरावर शिवसेना संपवण्याची भाषा करू लागले आहेत. मात्र ठिगळ लावलेल्या झेंडय़ापुढे भगवा झेंडा कधीही झुकणार नाही. येत्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीत त्यांना शिवसेना काय आहे. हे दाखवून देऊ असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.