“शरद पवार यांच्यावर खालच्या स्तरावर जाऊन भाजपाकडून टीका करण्यात आली आहे. याप्रकरणी पडळकर यांना माफी मागण्यास भाग पाडावे अन्यथा आम्ही अशा शिव्या देऊ की भाजपाच्या नेत्यांना झोप येणे कठीण होऊन बसेल,” असा अजब इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपाला दिला आहे. तसेच पडळकर यांचे बोलविते धनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेच आहेत, असा आरोपही त्यांनी केला. तसेच त्यांनी गोपीचंद पडळकर यांचा ‘गोप्या’ असा उल्लेख केला.

शरद पवार यांच्यावर आमदार पडळकर यांनी खालच्या पातळीवर टीका केल्यानंतर त्याचे पडसाद उमटू लागले. राष्ट्रवादीकडून पडळकर यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले तर पडळकर समर्थकांनी पडळकर यांच्या प्रतिमेवर दुधाचा अभिषेक घालून त्यांचा सन्मान केला. या मुद्द्याकडे लक्ष वेधून मुश्रीफांनी रविवारी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत पडळकरांवर आणि भाजपावर सडकून टीका केली. ते म्हणाले, “एकीकडे पडळकर याचे चुकले असे म्हणायचे आणि दुसरीकडे त्याचा दुधाचा अभिषेक घालून सन्मान करायचा अशी भाजपाची दुटप्पी नीती आहे. महात्मा गांधींचा खून करणाऱ्या नथुराम गोडसेचे जसे उदात्तीकरण केले गेले. तसेच पडळकरच्या बाबतीत केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणी चुकीचे वक्तव्य केले तर शरद पवार त्या कार्यकर्त्यास माफी मागण्यास भाग पाडतात. इतकेच नव्हे तर पक्षातून त्याची हकालपट्टी केली जाते. पण भाजपामध्ये मात्र याच्या उलट आहे. पडळकर यास माफी मागण्यास लावण्याऐवजी त्याच्या उदात्तीकरणाचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भडकलेले आहेत. त्यातून पडळकर समोर दिसल्यास कार्यकर्ते संतप्त होऊन टोकाची प्रतिक्रिया उमटू शकते. यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी घटना घडल्यास त्याला विरोधी पक्ष जबाबदार राहील”

दरम्यान, पडळकर यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, असे विधान खासदार नारायण राणे यांनी केले आहे. याबाबत मुश्रीफ म्हणाले, राणे यांची मुळात आता ताकद किती उरली आहे हे सर्वश्रुत आहे. विरोधक सरकार विचलित करण्याच्या प्रयत्नात आहेत का? या प्रश्नावर मुश्रीफ म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी अनेक प्रयत्न केले पण ते वाया गेले. राज्यात तीन पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार भक्कम असून त्याला कसलाही धोका असणार नाही.”