केंद्र सरकारने जाहीर केलेल्या कृषिमाल हटविण्याच्या निर्णयाचे स्वागत करताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने याच शासनाची दीडपट हमीभावाची भूलथापच असल्याची टीका केली आहे.

केंद्र शासनावर गेली सात वर्षे टीका करणारे माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रथमच शासनाच्या निर्णयाचे समर्थन केले. स्व. शरद जोशी यांनी सुचवलेली व आमची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी हीच होती. कृषी उत्पादनांना जीवनावश्यक यादीत टाकून एकप्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय झालेला होता. कृषी माल जीवनावश्यक यादीतून वगळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. कृषी उत्पादनाच्या जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत असलेल्या यादीतून केंद्र सरकारने डाळी, तेलबिया, बटाटा, खाद्यतेल, अन्नधान्य व कांदा हटविण्यात आल्याच्या निर्णयाचे स्वागत करतो. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी माहिती शेट्टी यांनी आज दिली. जागतिक बाजारपेठेत डाळी, तेल व तेलबियांचे दर उतरले असून सरकारने यांच्या आयातीवर अतिरिक्त कर लावावा अशी मागणी देखील त्यांनी केली.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पिकाची किमान आधारभूत किंमत ही महागाईच्या निर्देशांकानुसारही मिळालेली नसून दीडपट हमीभाव म्हणजे भूलथापच आहे, अशी टीका शेट्टी यांनी केली आहे. दीडपट हमीभाव सोडा पण ज्या पटीत डिझेल, खते, बि -बियाणे, मजुरी वाढली त्या पटीत तरी हमीभाव वाढविणे गरजेचे होते. केंद्र सरकारचे शेतीमालाविषयक अस्थिर धोरण आणि शेतमालाला योग्य हमीभाव मिळत नसल्यानेच शेतकरी आत्महत्या करीत आहेत. एकूणच शेती उत्पन्नावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.