दयानंद लिपारे

पुणे, सोलापूरवगळता इतर उमेदवार मूळ काँग्रेस विचारांचेच

देशात पुन्हा भाजप-शिवसेनेचे सरकार आणण्यासाठी युतीने लोकसभा निवडणुकीत तगडे उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न चालवला आहे. युतीची पश्चिमम महाराष्ट्रात प्रामुख्याने भिस्त राहिली आहे ती  काँग्रेस – राष्ट्रवादीमधील आयारामांवर. इतकेच नव्हे तर ज्या काँग्रेसच्या घराणेशाहीवर युतीच्या नेत्यांनी सातत्याने तोंडसुख घेतले त्याच घराणेशाहीपुढे मान तुकवून त्यांच्याच वारसांना उमेदवारी दिली आहे. नव्या घरंदाज उमेदवारांच्या प्रचाराची धुरा वाहायला सुरुवात केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी मतदारसंघांत युतीवर अशी स्थिती ओढवली आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये प्रवेश करण्याची चढाओढ लागली होती. यंदाही हेच चित्र राज्यात कायम आहे. विखे पाटील, मोहिते पाटील अशा बडय़ा घराण्यातील नातवंडांना युतीच्या छावणीत आणून उभय काँग्रेसला धक्का दिला आहे.

कोल्हापूर जिल्ह्य़ातील दोन्ही जागांवर शिवसेनेने उमेदवार उभे करताना पूर्वाश्रमीच्या काँग्रेसच्या वारसांची मदत घेतली आहे. सदाशिवराव मंडलिक आणि बाळासाहेब माने या काँग्रेसच्या दिवंगत खासदारांच्या घरातील अनुक्रमे संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांना आखाडय़ात उतरवले आहे. शेजारच्या सांगलीतील भाजपचे खासदार संजय पाटील हेही काँग्रेसच्याच मुशीतील. सातारा येथे काँग्रेस परंपरेतील अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र, राष्ट्रवादीकडून विधान परिषदेत पोहोचलेले नरेंद्र पाटील यांना शिवसेनेने भाजपच्या तंबूतून आणून हाती शिवबंधन बांधले आहे. तर, सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजित हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी भाजपने माढा मतदारसंघात उमेदवारी दिली आहे. पूर्वाश्रमी काँग्रेसचे हिंदुराव नाईक निंबाळकर नंतर शिवसेनेकडून खासदार झाले होते.

काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे यांना  भाजपने नगरची उमेदवारी दिली आहे. बारामतीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात दौण्डचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन या रिंगणात उतरल्या आहेत. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार सुभाष कुल यांचे सुपुत्र म्हणजे आमदार राहुल कुल, ते गतवेळी जानकर यांच्या रासपकडून विजयी झाले असले तरी त्यांची जवळीक भाजपशी आहे. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या राजकारणाचा श्रीगणेशा काँग्रेसमधून झाला होता. ते आणि त्यांचे थोरले बंधू हिरामण यांनी पिंपरी भागात काँग्रेसचे काम केले. शहर अध्यक्ष, नगरसेवक म्हणून काम केले.

घराणेशाहीची परंपरा कायम

  • सुप्रिया सूळे, उदयनराजे भोसले, धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार तसेच खासदारकीचे वेध लागलेले माढा येथील उमेदवार संजय शिंदे, नगरचे उमेदवार आमदार संग्राम जगताप, शिरूरमधील पार्थ पवार यांच्या रूपाने घराणेशाहीला पुढे चाल दिली आहे.
  • सांगलीत मात्र वसंतदादांचे नातू, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांच्यावर मात्र उमेदवारी मिळत नसल्याने काँग्रेसला रामराम ठोकण्याची वेळ आली आहे. पण त्यांचे बंधू विशाल हे अपक्ष म्हणून लढणार असून मिळालेच तर काँग्रेसचे तिकीटही स्वीकारणार आहेत.