News Flash

पश्चिम महाराष्ट्रात कमळ फुलविण्याची जबाबदारी मंत्र्यांच्या खांद्यावर

भाजपने पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभेच्या १० आणि विधानसभेच्या ५६ मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे

(संग्रहीत छायाचित्र)

दयानंद लिपारे, कोल्हापूर

पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जात असला तरी गेल्या निवडणुकीत या गडाला भगदाड पडले होते. अलीकडचे उभय काँग्रेसमध्ये लढण्याइतपत ऊर्जा आली असल्याने भाजपला कमळ फुलवण्यासाठी सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे. हे ओळखून लोकसभेच्या १० आणि विधानसभेच्या ५६ मतदारसंघात भक्कम बांधणीच्या आधारे चांगल्या यशासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, अन्न नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, सहकार मंत्री सुभाष देशमुख, भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुरेश हाळवणकर यांनी कंबर कसली आहे. विशेषत: चंद्रकांतदादांकडे मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

पश्चिम महाराष्ट्र हा प्रामुख्याने काँग्रेसचे वर्चस्व असलेला भाग म्हणून ओळखला जातो. साखर कारखानदारीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात गोडवा आणला त्याचप्रमाणे तो साखरसम्राट असलेल्या लोकप्रतिनिधींच्या जीवनातही आणला. सहकाराच्या बळावर काँग्रेसची मक्तेदारी बनली, पण गेल्या निवडणुकीत त्याला तडा गेला. मोदी लाटेत काँग्रेस- राष्ट्रवादीच्या भल्याभल्या नेत्यांना पराभूत व्हावे लागले. विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र कायम राहिले. केंद्र आणि राज्यात सत्ता आल्याने नंतर उभय काँग्रेसमधील अनेकांनी कमळ हाती घेतले. याच जोरावर भाजपाला नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुकीत दणदणीत यश खेचून आणले. काँग्रेसच्या या पट्टयमत भाजपने शिवसेनेवरही आघाडी घेतली. यशाचा हाच करिश्मा पुन्हा एकदा सिद्ध करण्यासाठी भाजपने पश्चिम महाराष्ट्रात पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.

भाजपने पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभेच्या १० आणि विधानसभेच्या ५६ मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे.  सध्या भाजपचे  पुणे, सांगली व सोलापूर येथे खासदार आहेत. तर, मित्रपक्ष शिवसेनेकडे मावळ व  शिरूर हे दोन मतदारसंघ  आहेत. आणखी एक मित्र असलेले राजू शेट्टी यांनी साथ सोडली आहे. आता शिवसेनेशी युती झाली तर त्यांच्या कोल्हापूर, सातारा, शिरूर व मावळ हे चार मतदारसंघ वगळता पुणे, सांगली, सोलापूर येथे काँग्रेसशी मुकाबला करावा लागणार आहे. त्यादृष्टीने भाजपने बांधणीला सुरुवात केली आहे. खेरीज, युती झाली नाहीं तरीही अन्य सात मतदारसंघांतही सज्जता ठेवली आहे. कार्यकर्त्यांना वेगवेगळे कार्यक्रम देऊन त्यांना निवडणूक होईपर्यंत गुंतवून ठेवले आहे. यावेळची निवडणूक मोदी-शहा यांचे नेतृत्व, विकासकामे आणि पक्षीय संघटनात्मक बांधणी याच्या जोरावर भाजप जिंकेल, असा दावा प्रदेश सरचिटणीस सुरेश हाळवणकर यांनी व्यक्त केला.

चंद्रकांतदादांचे तीन जिल्ह्यंवर लक्ष

पश्चिम महाराष्ट्रात भाजप वाढविण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बरीच मेहनत घेतली. सहकार खाते त्यांच्याकडे असताना सहकारातील राष्ट्रवादी व काँग्रेसची मक्तेदारी मोडीत काढण्याचा त्यांनी पद्धतशीरपणे प्रयत्न केला आणि त्यात त्यांना यशही आले. कोल्हापूर , सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यंवर चंद्रकांतदादांनी विशेषलक्ष केंद्रित केले आहे. चार लोकसभा आणि २६ विधानसभा मतदारसंघ नजरेसमोर ठेवून चाली रचल्या जात आहेत. सांगलीत काँग्रेसमधील अंतर्गत वादाचा लाभ उठवून संजयकाका पाटील यांना पुन्हा संसदेत पाठवण्यासाठी त्यांनी तयारी चालवली असून याकामी पक्षाचे चिटणीस मकरंद देशपांडे यांच्याकडे नियोजन सोपवले आहे. सातारा येथे  खासदार उदयनराजे भोसले यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क वाढला आहे. याचवेळी भाजपचे पुरुषोत्तम जाधव आणि विक्रम पावसकर यांच्यातील लोकसभेच्या उमेदवारीची स्पर्धा चांगलीच तापली असल्याने उमेदवारीच्या वादावर मंत्री पाटील प्रथम मात्रा काढावी लागणार आहे. दुसरीकडे, चंद्रकांतदादांनी विधानसभेच्या जोडण्यांकडे लक्ष पुरवले आहे.  कराड विधानसभेच्या दोन आणि सातारा शहर अशा तीन मतदारसंघात शह देण्याची रणनीती ठरत आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात अतुल भोसले, बाळासाहेब पाटील यांच्याविरोधात मनोज घोरपडे आणि सातारम्य़ात शिवेंद्रराजे भोसले यांच्याविरोधात दीपक पवार यांना ताकद दिली आहे . शिवाय, माण- खटाव मध्ये  जयप्रकाश गोरे यांच्या विरोधात माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, अनिल देसाई शेखर गोरे, कोरेगाव मध्ये शशिकांत शिंदे यांच्या विरोधात उद्य्ोजक महेश शिंदे अशा लढती गृहीत धरून तेथे कमळ फुलण्यासाठी मंत्री पाटील यांनी आतापासूनच लक्ष घातले आहे. पश्चिम महाराष्ट्रात  ‘मिशन कमळ‘फुलावे यासाठी भाजपच्या उमेदवारांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. कोल्हापुरातील दोन आणि सांगलीतील चार विधानसभा मतदारसंघात यशाची पुनरावृत्ती व्हावी असाही प्रयत्न आहेच.

काँग्रेस- राष्ट्रवादीचे कडवे आव्हान

सद्य्स्थितीत भाजप इतकी संघटनात्मक बांधणी अन्य पक्षांकडे दिसत नाही. प्रशिक्षित कार्यकर्त्यांची कुमक निवडणुकीसाठी लाभदायक ठरण्याची चिन्हे आहेत. याचवेळी संयुक्तपणे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीत उतरत असल्याने त्यांचे आव्हान सोपे असणार नाही. सत्ता गमावल्यापासून गेली चार वर्षे मरगळ आलेल्या उभय काँग्रेसमध्ये संघटनात्मक बांधणीचा अभाव आहे. मात्र, शेजारच्या कर्नाटक आणि पाच राज्यातील यशाने पश्चिममहारष्ट्रातील उभय काँग्रेसमध्ये विरोधकांना भिडण्याइतकी ऊर्जा मिळाली आहे. सहकार-शिक्षण संस्थांवर असलेले प्रभुत्व त्यांना निवडणुकीसाठी लाभदायक ठरू शकते. विरोधक म्हणून सक्रिय होण्याचाही फायदा होऊ  शकतो. मोदींची लोकप्रियता पूर्वीइतकी राहिली नाही. भाजपचे विकासाचे चित्र प्रतेक्षात उतरलेले नाही. त्यामुळे यंदा भाजपसह विरोधकांचे आव्हान सोपे असेल, असे उभय काँग्रेसच्या गोटातून सांगितले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2019 1:16 am

Web Title: western maharashtra responsibility on bjp ministers shoulders
Next Stories
1 रशियातील जहाज अपघातात कोल्हापूरचा तरुण बेपत्ता
2 महाराष्ट्र क्रांती सेनेचे लोकसभेचे उमेदवार जाहीर
3 पानसरे हत्या प्रकरण : अमित डेगवेकर याच्या पोलीस कोठडीत वाढ
Just Now!
X