कामगार, शेतमजूरविरोधी कायदे, महागाई वाढीस पूरक धोरणे यामुळे राज्यातील शासन जनतेच्या मनातून उतरलेले आहे. त्यांनी सामान्य जनतेची चालवलेली थट्टा पाहता विकासाची स्वप्ने दाखविणाऱ्या सत्ताधाऱ्यांना ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ असे म्हणणे वेळ आली आहे, अशी उपरोधिक टीका काँग्रेसचे कामगार नेते, आमदार भाई जगताप यांनी येथे पत्रकार परिषदेत केली. कामगारविरोधी धोरण, वाढती महागाई याच्या निषेधार्थ हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे सर्व कामगार संघटनांना एकत्रित करून काँग्रेस पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली.
येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार जगताप म्हणाले, सरकारने कामगारांच्या हिताचे कायदे रद्द करून मालकधार्जिण कायदे तयार केले आहेत. कामगारांना जो कायद्याचा आधार होता तो काढून घेतला आहे. नेमके हे सरकार कुणाच्या बाजूने आहे न उलगडलेले कोडे आहे. कामगारांच्या बाजूने कायदे झाले नाही तर त्यांच्यावर वेठबिगारीची वेळ येईल. शेतकऱ्यांच्या बाबतीत कोणताही ठोस निर्णय नाही. मेक इन इंडिया आणि मेक इन महाराष्ट्रचा नारा दिला जात आहे पण नेमकी काय वस्तुस्थिती आहे ती सांगावी. राज्यातील उद्योग बाहेर जात आहेत मग हे नेमके काय करत आहेत. मुख्यमंत्री म्हणतात की कर्जमुक्ती करून आत्महत्या थांबत नाहीत, हे वक्तव्य चुकीचे यांचा निषेध त्यांनी केला. आघाडी सरकारने ज्या योजन राबवल्या आहेत त्याच योजना हे सरकार नाव बदलून राबवत आहे. सरकारचे पथकाकडून पाहणी केली जाते पण दमडाही दिलेला नाही. हे सरकार फक्त योजना राबवून फक्त फोटो सेशन करण्यातच धन्यता मानत आहे. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर फक्त घोषणा करत आहे पण यांची अंमलबजावणी कुठून करणार. महागाई बाबत बोलताना जगताप म्हणाले, महागाई नियंत्रणात आणणे हे सरकारचे काम आहे. महाराष्ट्रातील शेतकरी टाहो फोडत आहे पण त्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही.
हे सरकार फक्त इव्हेंट करून सोशल मीडियाच्या आधारे आपली पाठ स्वत:च थोपटून घेत आहेत. पण वस्तुस्थिती वेगळी आहे. शेतकाऱ्यांची आत्महत्या, कर्जमुक्ती महागाई कामगारांच्या कायद्यातील बदल यासह अन्य विषयावर काँग्रेसच्या वतीने येत्या हिवाळी अधिवेशनात ८ डिसेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. मध्यावधी निवडणुकीबाबत विचारले असता ते म्हणाले भाजप आणि शिवसेना यांचे काही खरं नाही. याबाबत उद्धव ठाकरेच बोलू शकतात. दिशाहीन करून ठेवलेल्या महाराष्ट्राला कधी दिशेवर आणणार, असा सवाल प्रश्न उपस्थित केला.