आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शताब्दी वर्षांनिमित्त इचलकरंजी भारतीय जनता पार्टी, महिला आघाडीच्या वत्तीने आयोजित महिला महोत्सव २०१६ ला रविवारी इचलकरंजी येथे प्रारंभ झाला. गुलाबी फेटे आणि भगव्या साडय़ा परिधान केलेल्या रणरागिणींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देत व पारंपरिक वाद्यांच्या निनादात मिरवणूक काढली.
आमदार सुरेश हाळवणकर यांच्या हस्ते व नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे, भाजपा जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, नगरसेवक अजित जाधव, यांच्या प्रमुख उपस्थितीत जयहिंद मंडळपासून रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. या रॅलीमध्ये शिवकालीन वेशभूषा परिधान केलेले कलाकार, पाणी वाचवा, दुष्काळ मुक्त महाराष्ट्र, बेटी बचावो-बेटी पढावो, स्वच्छ भारत अभियान, शिक्षणाचे महत्त्व आदी विषयांचे चित्ररथ सामील झाले होते. तसेच सामाजिक प्रबोधनपर फलक घेऊन शालेय मुली सहभागी झाल्या.
रॅली मलाबादे चौक, गांधी पुतळा माग्रे श्रीमंत ना.बा. घोरपडे नाटय़गृह परिसरात आली.  नाटय़गृहात दीपप्रज्वलन करून महोत्सवाची सुरूवात करण्यात आली. सकाळच्या सत्रात कोल्हापूर येथील वास्तुविशारद अमरजा निंबाळकर यांचे महिलांच्या सद्य:स्थितीबाबत व्याख्यान झाले. संध्याकाळच्या सत्रात सिने कलाकार संजय मोहीते यांच्या सूत्रसंचालनाखाली पठणी महाहोम मिनिस्टर गेम शो पार पडला. सर्व कार्यक्रमांना महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.