दयानंद लिपारे

टाळेबंदीमुळे सध्या कामगार अस्वस्थ आहेत. कोल्हापूर जिल्ह्य़ात आठवडय़ाभरात चार वेळा परप्रांतीय कामगारांनी रस्त्यावर उतरून केलेला आक्रोश याबाबत बोलका ठरणारा आहे. परप्रांतीय कामगारांचे लोंढे रस्त्यावर उतरत असले तरी या प्रश्नाबाबत साकल्याने विचार होत नाही. शासन-प्रशासन उद्योजक आणि कामगार यांच्यात समन्वयाचा अभाव अशा उद्रेकांना निमंत्रण देणारा आहे. करोनाच्या रुग्णांचा आकडा साठीकडे झुकला असताना सोमवारी तर परप्रांतीय कामगारांनी पोलीस-सरपंच यांच्यावर हल्ला चढवल्याने या संघर्षांने कोल्हापूरकरांसमोर नवी डोकेदुखी निर्माण झाली आहे.

साठ हजारांवर परप्रांतीय कामगार

कोल्हापूर जिल्हा औद्योगिक पातळीवर अग्रेसर असून ६० हजारांहून अधिक परप्रांतीय कामगार आहेत. बहुतेक कंत्राटी तत्त्वावर काम करीत ठेकेदाराकडून मिळणाऱ्या मजुरीवर त्यांना समाधान मानावे लागते. शासनाचे कामगारविषयक लाभ त्यांच्या पदरी अभावानेच पडतात. टाळेबंदी सुरू झाल्याने कामाची सोय नाही.  शिल्लक रक्कम संपत आली आहे. अशातच त्यांच्यात मूळच्या गावात राहणाऱ्या परिवारातील लोकांना भेटण्याच्या इच्छेतून कधी एकदा गावी पोहोचतो याची ओढ लागली आहे. त्यात आरोग्य प्रमाणपत्र, प्रवास परवाना पत्रासाठी लागलेल्या रांगा आणि मंदगतीने चाललेले कामकाज कामगारांचा संताप वाढवण्यास कारणीभूत ठरत आहे.

कोल्हापुरातून आत्तापर्यंत सात हजार मजूर रवाना झाले आहेत. जिल्ह्य़ातील अन्य कामगार गावाकडे रवाना झाले, इतर प्रांतातील कामगार पोहोचले; पण आमच्याच नशिबी प्रतीक्षा करणे का, अशी विचारांची कालवाकालव हजारो कामगारांच्या मनामध्ये सुरू आहे.

कोल्हापुरात करोनाचा मुकाबला करताना ‘राजा बोले दल हाले’ अशी अवस्था आहे. उद्योजक, कामगार विभाग यांना प्रशासनाकडून कामगारांची गैरसोय होणार नाही याची काटेकोर दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी कागदी घोडे नाचवले जात आहे. अनेक छोटे, कुटीर उद्योजकांना स्वत:चीच गुजराण करणे कठीण बनल्याने त्यांनी कामगारांना वाऱ्यावर सोडले आहे. ज्या कामगारांना चांगल्या सुविधा मिळत आहेत अशा हजारो कामगारांनी गावी जाण्याचा विचार सोडून कामात पुन्हा गुंतवून घेतले आहे. मात्र, नाराज झालेल्या कामगारांनी इचलकरंजी, शिरोली-कोल्हापूर, हातकणंगले येथे संताप व्यक्त केला.

परप्रांतीयांचे हल्ले चिंताजनक

सोमवारी पुन्हा खोतवाडी (इचलकरंजी) येथे पाचशेवर कामगारांनी ग्रामपंचायत इमारत, सरपंच आणि पोलीस पथकावर हल्ला केला. दगडफेकीत महिला पोलीस जखमी झाली. या संतापातून त्यांच्या जगण्यातील कटू वास्तव समोर येत आहे. मार्गस्थ होणाऱ्या कामगारांची संख्या आणि इच्छुकांची संख्या यामध्ये प्रचंड अंतर आहे. जे अजूनही जाण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्या मनातील घालमेल सुरू आहे. कामगारात अस्वस्थता कशामुळे भरून राहिले आहे याच्या तपशिलात जाण्याची कोणाची इच्छा नाही. कामाचे कौतुक व्हावे, स्तुतिसुमने उधळली जावीत याचा सोस नडत आहे. नेमका विचार करून कृती केल्याशिवाय हा उद्रेक शमण्याची चिन्हे नाहीत. या वास्तवाला सामोरे जाण्याचे धैर्य शासन, प्रशासनाने दाखवले नाही तर असे प्रसंग पुन:पुन्हा उद्भवण्याची चिन्हे दिसत आहेत.

‘परराज्यातील कामगारांना रेल्वेने पाठवण्याची काळजी घेतली आहे. प्रत्येकाला माझा नंबर आधी लागावा असे वाटत असले तरी प्रशासकीय पूर्तता झाल्याशिवाय प्रवास करता येणार नाही. काही राज्यांनी अद्याप परवानगी दिली नाही. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश या राज्यात रेल्वे गेल्या असून त्यांना भोजन संच दिला आहे. प्रवाशांनी संयमाने वागले पाहिजे, प्रशासनाने त्यांच्याशी सुसंवाद राखला पाहिजे.

– सतेज पाटील, पालकमंत्री

कामगारांच्या जिवावर उद्योग वाढवला. आता संकटसमयी त्यांना निराधार सोडणे अनुचित आहे. अस्वस्थ कामगारांचे भावविश्व समजून घेण्यात प्रशासन कमी पडत आहे. दंडुका उगारून प्रश्न सुटणार नाही.

–  राजू शेट्टी, माजी खासदार