कोल्हापूर :  महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जागतिक बँकेचे पथक मंगळवारी कोल्हापुरात दाखल झाले असून ते जिल्हाभर फिरून आढावा घेणार आहेत. आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत बैठक पार पडली. दरम्यान, कोल्हापुरात आज पावसाने उघडीप दिली असून पूरपातळी किंचित कमी झाली आहे. सकाळी पंचगंगा नदी इशारा पातळीपेक्षा एक फुटाने अधिक (४० फूट ) वाहत होती.

महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जागतिक बँकेचे पथक मंगळवारी कोल्हापुरात दाखल झाले. पथकात बँकेच्या १७ वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. महापुरामुळे झालेल्या नुकसानीची  माहिती देण्यात आली. अनुप कारंथ, पियुष शेखारिया, पूनम अहलुवालिया, राज सिंग, एदुआदो फरेरा आदींचा पथकात समावेश आहे.

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कोल्हापूर जिल्ह्यांतील झालेल्या नुकसानीची तर सांगली जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी सांगली जिल्ह्यांतील नुकसानीचे संगणकीय सादरीकरण केले.

यावेळी मुंबई महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी, कोल्हापूर महापालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी विविध विभागाचे अधिकारी उपस्थितीत होते. या बैठकीत पुन्हा महापुराची स्थिती उद्भवू नये यासाठी कोणत्या उपाययोजना करणे गरजेचे आहे याचा आढावा घेतला जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या बैठकीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील धरणे, बंधारे, पंपिंग हाऊस, नदी काठावरील गावांची पाहणी करण्याठी रवाना झाले.

पावसाची विश्रांती

महापुरानंतर पावसाने विश्रांती घेतली होती. गेले दहा-बारा दिवस कमी अधिक पाऊस पडत आहे. पंचगंगा नदीने रविवारी इशारा पातळी गाठली होती. पावसाची गती पाहता पुन्हा पूरस्थितीची लक्षणे होती. गणेश विसर्जन मिरवणुकीला अडथळा निर्माण होण्याची चिन्हे होती. मात्र, आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळीही कमी होऊ  लागली आहे. पुराचा धोका टळला  जात असल्याचे दिसत आहे. राधानगरी धरणाच्या २ स्वयंचलित दरवाज्यामधून राधानगरीतून ४२५६,  तर अलमट्टीमधून २ लाख १३ हजार क्यूसेक विसर्ग सुरु आहे. जिल्ह्यात ४९ बंधारे पाण्याखाली आहेत. ७ राज्य तर १३ प्रमुख जिल्हा मार्ग बंद असून पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे.