यंदा १० लाख फुलांची निर्यात

दयानंद लिपारे, लोकसत्ता

कोल्हापूर : जोडीदाराच्या हाती गुलाब देऊन प्रेमभावना व्यक्त करणारा प्रेमीयुगुलांचा दिवस म्हणजे ‘व्हॅलेंटाइन डे’. प्रेम-भारल्या या दिवसासाठी जगभरातील अनेकांच्या हाती यंदा शिरोळ तालुक्यातील लालजर्द गुलाब असणार आहे. कारण येथील ‘श्रीवर्धन बायोटेक’मधून १० लाख फुले निर्यात करण्यात आली असून यातील पाच लाख गुलाबपुष्पे युरोप आणि ऑस्ट्रेलियात पाठवली आहेत.

दरवर्षी जगभर १४ फेब्रुवारी हा ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा केला जातो. गेल्या काही वर्षांत भारतातही याचा प्रसार झाला आहे. प्रेमभावना व्यक्त करताना एकमेकांना हाती गुलाबाचे फूल देऊन हा दिवस सर्वत्र साजरा केला जातो. यामुळे आपोआपच या दिवशी गुलाबाला त्यातही त्याच्या लालजर्द फुलाला मोठी मागणी असते.

आधुनिक पद्धतीने हरितगृहातून अशा गुलाबांचे उत्पादन घेतले जाते. कोल्हापूर जिल्ह्य़ातील शिरोळ तालुका आणि त्यातही येथील ‘श्रीवर्धन बायोटेक’ गुलाबाची ही मोठी मागणी दरवर्षी पूर्ण करत असते.

दिवंगत आमदार डॉ. सा. रे. पाटील यांनी शिरोळ तालुक्यातील कोंडिग्रे गावातील ओसाड माळावर ‘श्रीवर्धन बायोटेक’ची २० वर्षांपूर्वी सुरुवात केली. आता येथे ११० एकरावर हरितगृहातील पुष्पशेती बहरली आहे. या हरितगृहातून यंदा देश-विदेशात १० लाख लालजर्द गुलाब पाठवले आहेत. यातील पाच लाख फुले एकटय़ा युरोप आणि ऑस्ट्रेलियात निर्यात झाल्याचे ‘श्रीवर्धन बायोटेक’चे व्यवस्थापक रमेश पाटील यांनी सांगितले.

दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस शेती आणि साखर उत्पादन यात उल्लेखनीय कामगिरी करणारे उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी तितक्याच निगुतीने ही हरितगृहाची शेती कसली आहे. गुलाबासह इथे विविध प्रकारची फुले, भाजी यांचेही निर्यातक्षम उत्पादन ते अत्याधुनिक शेतीमध्ये घेत आहेत.

अनुकूल वातावरण

यंदा कडाक्याची थंडी नसल्याने हरितगृहातील गुलाबाची वाढ उत्तम प्रकारे होण्यास मदत झाली आहे. कडाक्याच्या थंडीत गुलाबाचे उत्पादन होण्यास ५२ दिवसांचा अवधी लागतो. यंदा मात्र थंडी बेताची राहिल्याने गुलाबाची वाढ चांगली होत तो वेळेवर तयार झाला आहे. फुलांची योग्य वाढ झाल्यास त्याचा आकार, रंगही लक्षवेधी राहतो. वेळेत आणि दर्जेदार उत्पादन मिळाल्यामुळे यंदा गुलाब उत्पादकांना अधिकाधिक निर्यात करणे शक्य झाले आहे. याखेरीज यंदा दरातही २५ टक्के वाढ मिळाली आहे. सध्या एका फुलाला विदेशात १० ते २० रुपये तर भारतीय बाजारपेठेत सरासरी दहा रुपये दर मिळत आहे.

– गणपतराव पाटील, उद्यानपंडित