News Flash

विठू नामाच्या गजरात नंदवाळची वारी उत्साहात

आषाढी एकादशी निमित्त आज मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरात यथासांग विठ्ठलाची पूजा करण्यात आली

प्रति पंढरपूर नंदवाळच्या वारीत वारकऱ्यांचा असा भक्तिरंग दिसत होता. ( छाया - राज मकानदार)

कोल्हापूर : विठू माउलीच्या अखंड नामजपात शहर व परिसरातील वारकऱ्यांनी प्रति पंढरपूर नंदवाळच्या वारीत उपस्थिती लावली होती. करोनाच्या पार्श्वभूमीवर छोटेखानी स्वरूपात ही  वारी पार पडली. वारकऱ्यांना ‘करोना काळात जगण्याचे बळ दे’ असे साकडे पांडुरंगाला घातले.

आषाढी एकादशी निमित्त आज मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरात यथासांग विठ्ठलाची पूजा करण्यात आली. फुलांनी सुशोभित केलेली बस, पावसाच्या सरीत टाळचिपळ्यांच्या निनादात अखंड विठू नामाचा जप करणारे वारकरी, डोक्यावर  वृंदावन घेतलेल्या सुवासिनी आणि रस्त्याच्या पालखी समोर पाणी घालणारे भक्त.. अशा थाटात पालखीने नंदवाळकडे प्रस्थान केले. वसंतराव देशमुख, रणवीर शिर्के यांच्या हस्ते विठ्ठलाची आरती तर जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे प्रमोद जाधव, विश्व हिंदू परिषदेचे अ‍ॅड. रणजितसिंह घाटगे यांच्या हस्ते अश्वपूजन करण्यात आले. मंदिरातच छोटेखानी रिंगण सोहळा रंगला.   करोनामुळे कोल्हापुरातून ही वारी पायी न करता ठरावीक वारकऱ्यांसह बसने आयोजित केली होती. बिनखांबी गणेश मंदिर, उभा मारुती चौक ते खंडोबा तालीम येथपर्यंतच पायी वारीला परवानगी असल्याने त्यानंतरची वारी बसद्वारा करण्यात आली. वारीचे आयोजन ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळा भक्त मंडळ आणि जयशिवराय फुटबॉल प्लेअर तरुण मंडळ आणि राधेय ग्रुपने केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2021 1:53 am

Web Title: worship of lord vithal on the occasion of ashadi ekadashi zws 70
Next Stories
1 कोल्हापुरात व्यापाऱ्यांची मिरवणूक; गुन्हा दाखल
2 कोल्हापूर जिल्ह्यतील व्यापार सुरू; ग्राहकांचा प्रतिसाद
3 रक्त संकलन पिशवी पुरवठ्यातील अनागोंदीने रक्तपेढ्या त्रस्त
Just Now!
X