दयानंद लिपारे

करोनाविरुद्धच्या लढाईत महत्त्वाच्या ठरणाऱ्या हाताच्या स्वच्छतेची आठवण करून देणाऱ्या एका मनगटी पट्टय़ाची (रिस्ट बॅण्ड) पुण्यातील संशोधकांनी निर्मिती केली आहे. या उपकरणाद्वारे आपल्या हाताचा कुठल्याही पृष्ठभागाशी स्पर्श झाला, की हा पट्टा त्या व्यक्तीला कंपनांद्वारे सूचित करेल आणि यातच असलेल्या ‘सॅनिटायझर’च्या साठय़ातून लगेच त्याचा वापर करत हात र्निजतुकही करता येणार आहे.

करोनाविरुद्धची लढाई सोपी आणि निर्णायक व्हावी यासाठी वैद्यकीय, संशोधन क्षेत्रात विविध प्रयोग सुरू आहेत. याअंतर्गतच पुण्यातील ‘एमआयटी’च्या ‘स्कूल ऑफ कॉम्प्युटर इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी’मधील डॉ. शर्मिष्ठा देसाई आणि त्यांच्या पाच विद्यार्थ्यांनी मिळून हा ‘ट्रेडेंट रिस्ट बॅण्ड’ विकसित केला आहे.

सरकारने करोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी उपकरणे विकसित करण्याचे आवाहन केले असून त्याला प्रतिसाद म्हणून या ‘रिस्ट बॅण्ड’ची रचना सादर केल्याचे डॉ. देसाई यांनी सांगितले. त्यांना या निर्मितीत आशीष अटकर, देवेश भोगरे, अथर्व बर्वे, विश्वझ सिंग आणि शिवम् श्रीराव या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले आहे.

मूळच्या आजरा (जि. कोल्हापूर) येथील असलेल्या डॉ. देसाई या गेली १७ वर्षे अध्यापन आणि संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘रिस्ट बॅण्ड’विषयी सांगताना त्या म्हणाल्या, की २००९ साली ‘गूगल’ने अशा प्रकारच्या ‘रिस्ट बॅण्ड’ची कल्पना पुढे आणली होती. त्यातूनच आम्ही अशा प्रकारचे स्पर्शानंतर सूचित करणारे उपकरण विकसित करण्याचा ध्यास घेतला आणि त्यात यश आले आहे. आमच्या या संशोधनाला सरकारची मान्यता मिळाल्यास याचे उत्पादन सुरू होऊ शकते. हे उपकरण तयार करण्यासाठी आम्हाला अडीच हजार रुपये खर्च आला आहे.

असा आहे हा ‘रिस्ट बॅण्ड’!

हा ‘रिस्ट बॅण्ड’ मनगटी पट्टय़ाच्या रूपात आहे. त्यात विकसित केलेल्या संगणकीय यंत्रणेमुळे आपला हात कुठल्याही पृष्ठभागावर लागला की हा पट्टा आपल्याला कंपनांद्वारे सूचित करेल. तसेच या पट्टय़ातच असलेल्या ‘सॅनिटायझर’च्या साठय़ातून लगेच त्याचा वापर करत हात र्निजतुक करता येईल. तसेच मोबाइलसारख्या एखाद्या विशिष्ट वस्तूचा सतत वापर झाल्यास त्याबाबत स्वतंत्र सूचना देणारी यंत्रणाही या उपकरणात आहे.