तोंडात कापडी बोळा कोंबून एका तरुणीचा खून करून गुन्ह्य़ाचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून चेहरा जाळण्यात आला आहे. मोहोळ येथे एका पडीक शेतात हा प्रकार उघडकीस आला. मृतदेहाची ओळख पटली नसून हा खून कोणी व कशासाठी केला, याचा उलगडा झाला नाही.
मोहोळ येथे नरखेड रस्त्यावर कमलाकर गायकवाड यांच्या पडीक शेतात २५ ते ३० वर्षांच्या तरुणीचा मृतदेह आढळून आला. कोणी तरी अज्ञात व्यक्तींनी या तरुणीच्या तोंडात कापडी बोळा कोंबून तिचा तीक्ष्ण हत्याराने मारून खून केला. नंतर मृतदेह जाळण्याचा प्रयत्न झाला. चेहऱ्यावर, गळ्यावर, पोटावर गंभीर भाजल्याच्या खुणा आढळून आल्या आहेत. विशेषत: मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप करण्यात आला आहे. खून करून गुन्ह्य़ाचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह गायकवाड यांच्या पडीक शेतात आणून टाकल्याचे दिसून आले. मृत तरुणी रंगाने सावळी असून उंची ५ फूट २ इंच, नाक नकटे, केस काळे, दोन्ही हातात लाल व हिरव्या रंगाच्या बांगडय़ा, अंगावर अर्धवट जळालेली पिवळ्या रंगाची साडी, त्यावर मोरपंखी व लाल रंगाचे काठ, मोरपंखी रंगाचा ब्लाऊज आहे. मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम मोहोळ पोलीस करीत आहेत. तिचा खून कोणी व कशासाठी केला, याचा तपास पोलीस निरीक्षक सूरज बंडगर हे करीत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 27, 2016 2:10 am