News Flash

निसर्ग वाचनाचे प्रतिबिंब लेखनात उमटले !

युवा साहित्य अकादमी पुरस्कारविजेते सलीम मुल्ला यांची भावना

युवा साहित्य अकादमी पुरस्कारविजेते सलीम मुल्ला

युवा साहित्य अकादमी पुरस्कारविजेते सलीम मुल्ला यांची भावना

दयानंद लिपारे, कोल्हापूर

बालपणापासून निसर्ग सहवासाचे संस्कार झाले. पश्चिम घाटाच्या कुशीतील निसर्गाचे वरदान लाभलेला भूभाग सदैव खुणावत राहिला. निसर्ग वाचनाचे हे प्रतिबिंब लेखनात उमटले. निसर्गाच्या या रूपांना शब्दबद्ध केलेले वाचकांनाही आवडले याचा आनंद वाटतो असे युवा साहित्यिक सलीम मुल्ला सांगत होते. मुल्ला यांच्या ‘जंगल खजिन्याचा शोध’ या पहिल्यावहिल्या बालकादंबरीस नुकताच युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. या पाश्र्वभूमीवर आपली साहित्याची रानवाट कशी आकाराला आली याविषयी मुल्ला ‘लोकसत्ता’शी बोलत होते.

सलीम मुल्ला उच्च शिक्षित. स्थापत्य अभियांत्रिकीची पदविका घेतल्यानंतर त्यांनी ‘इंटिरिअर डेकोरेटिव्ह डिझाइन’ मधून पदवी मिळवली. परंतु त्यांना सुरुवातीपासून निसर्गाची आवड असल्याने त्यांनी वन विभागात नोकरी मिळवली. खरेतर बालपणीच त्यांच्यावर हे निसर्ग सहवासाचे संस्कार झाले. त्यांचे आईवडील दोघेही शिक्षक. नोकरीची ठिकाणे नेहमी बदलणारी. तीही पश्चिम घाटाच्या कुशीतील निसर्गाचे वरदान लाभलेल्या कोल्हापूरच्या डोंगराळ परिसरातील. निसर्ग वाचन करता करता माध्यमिक शाळेत शिकणारा सलीम निसर्गावर कविता, बालकथा लिहू लागला. वडिलांचे बालसाहित्यिक असलेले मित्र विठ्ठल कृष्णा सुतार यांनी लिहिण्यासाठी प्रेरणा दिली.

किशोर वयात सलीम यांच्या हाती व्यंकटेश माडगूळकर, मारुती चित्तमपल्ली अशा निसर्गाशी एकरूप झालेल्या प्रथितयश लेखकांची पुस्तके पडली. माडगूळकरांचा निसर्गाकडे पाहण्याचा प्रगल्भ दृष्टिकोन, चित्तमपल्लींचे थक्क करणारे निसर्गवाचन यामुळे सलीम यांचे निसर्गप्रेम,निसर्गमैत्र आणखी दृढ होत गेले. निसर्गात भटकंती करताना आलेले वैशिष्टय़पूर्ण, कुतूहल वाढवणारे, नवलाईचे काहीसे चमत्कारिक अनुभव शब्दबद्ध करण्याचा ध्यास लागला. २००२ साली ‘अवलिया’  हे ललित लेखनाचे पुस्तक त्यांनी लिहिले. चोखंदळ वाचकांनी त्याला दाद दिली. पुढे वनखात्यातील नोकरीनंतर तर त्यांचे निसर्गाला कवेत घेणाऱ्या कविता, बालकथा, ललित लेख, वृत्तपत्रीय लेख असे विविधांगी लेखन सुरू झाले.

औषधी वनस्पतींच्या तस्करीवर कथा

मुल्ला यांना वनखात्यात नोकरी मिळाली. या दरम्यान त्यांची नोकरीची ठिकाणे ही रत्नागिरी आणि कोल्हापूर दरम्यान पश्चिम घाटात राहिली. या कालावधीत निसर्गाच्या अधिक जवळ जाणे झाले. या अनुभवातूनच त्यांची ‘जंगल खजिन्याचा शोध’ ही ५० पानांची किशोर कादंबरी २०१४ साली साकारली. जंगलातल्या औषधी वनस्पती कंदमुळं यांची होणारी तस्करी लहान मुले कशी प्रकाशात आणतात. या तस्कराचे निर्दालन करण्यात ही मुले कशी यशस्वी होतात याचा पट या कादंबरीत चितारला आहे. ‘पेणा आणि चिकाटी’ आणि ‘अजबाईतून उतराई’ या त्यांच्या दोन बाल कादंबऱ्या प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2019 3:43 am

Web Title: yuva sahitya akademi puraskar winner writer salim mulla feeling zws 70
Next Stories
1 कोल्हापुरातील रखडलेले पाणी प्रकल्प तातडीने मार्गी लावणार-चंद्रकांत पाटील
2 मुंबईतील बैठकीत लोकायुक्त मसुद्याला अंतिम स्वरुप : अण्णा हजारे
3 शाहू महाराजांच्या स्मारकाबाबत फक्त घोषणाच
Just Now!
X