रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत असलेल्या एनसीसी कॅम्पसाठी शुक्रवारी शालेय विद्यार्थ्यांना टेम्पोमधून नेत असताना चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात दोन शिक्षकांसह, चालक, २० विद्यार्थी-विद्यार्थिनी जखमी झाले. यापकी सात विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. गांधीनगर वसगडे मार्गावर मन्ना डे माळनजीक सरस्वती साडी सेंटरच्या वळणावर शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. रस्ता सुरक्षा सप्ताह सुरू असताना याच काळात शालेय विद्यार्थ्यांना कॅम्पसाठी टेम्पोमधून प्रवाशी वाहन संख्येचे उल्लंघन करून नेल्याने शाळा व्यवस्थापनाविरोधात पालकातून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. या घटनेची नोंद गांधीनगर पोलीस ठाण्यात झाली.
वसगडे येथील बापूसो पाटील हायस्कूलमध्ये रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत तसेच २६ जानेवारीच्या संचलनानिमित्त परेड स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गांधीनगर येथील छत्रपती युवराज शाहू महाराज महाविद्यालयाने आपल सहभाग नोंदविला होता. स्पध्रेमध्ये सहभागी होण्यासाठी शाळेतील ९ वी, १० वीचे विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते. स्पध्रेत सहभागी होण्यासाठी प्रवेश शुल्क म्हणून शाळेने प्रत्येक विद्यार्थ्यांकडून ३० रुपये वसूल केले होते. मन्ना डे माळ येथील सरस्वती सेंटर समोर असणाऱ्या वळणाचा अंदाज न आल्याने चालक राजु कुडची यांचा टेम्पोवरील ताबा सुटल्याने पलटी झाला व रस्त्याकडेला असणाऱ्या शेतवडीमध्ये कोसळला. घटनेची माहिती मिळताच नागरिक तत्काळ गोळा झाले. त्यांनी अपघातग्रस्त मुलांना तातडीने टेम्पोमधून बाहेर काढत मिळेल त्या वाहनाने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयाकडे पाठविले. सीपीआर रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने तातडीने पावले उचलत जखमींवर उपचार सुरू केले.