कोल्हापूर : विघ्नहर्ता गणरायाचे आगमन होत असताना कोल्हापुरात वाद्यांच्या भिंती आणि लेझर किरणांचा उपद्रव अनेकांना झाला आहे. आगमन दिवशी तिघांना गंभीर दृष्टीदोष झाल्याचे पुढे आले आहे. तर गेली दोन वर्षे मिरवणुकीत दीडशेवर रुग्णांच्या डोळ्यांना गंभीर इजा झाल्याने कोल्हापुरातील नेत्र शल्य चिकित्सक संघटनेने गणेश उत्सवासह सर्वच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये धोकादायक लेझर किरणांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा >>> आपटे वाचन मंदिराला नावीन्यपूर्ण उपक्रमांचा ध्यास

काल कोल्हापुरात गणरायाचे उत्साहात आगमन झाले. स्पिकरच्या भिंती उभारणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला असला तरी त्याकडे दुर्लक्ष करीत अनेक मंडळांनी वाद्यांचा खणखणाट बिनबोभाटपणे चालवला होता. मिरवणुकीत तीव्र प्रकाश किरण आणणाऱ्या लेसर किरणांमुळे तिघांना प्रखर किरणामुळे नेत्रदोष उद्भवला असून त्यांना उपचार घ्यावे लागले आहेत. कोल्हापुरातील नेत्रविकारतज्ज्ञांच्या संघटनेकडे सन २०२२ आणि २०२३ या वर्षात गणेशोत्सव, दिवाळी, नवरात्र, दहीहंडी या सणांच्या काळात ७० ते ८० याप्रमाणे दीडशेवर रुग्णांना लेझर लाईट डोळ्यावर पडल्याने गंभीर दृष्टीदोष झाल्याची माहिती संकलित झाली आहे. ह्य लेझरमुळे नेत्रपटलांना इजा झालेल्या तरुण रुग्णांची संख्या वाढता आहे. हा उपद्रव वाढत असल्याने यावर बंदी घालावी अशी मागणी कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडे केली आहे, कोल्हापूर नेत्रविकारतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. चेतन खारकांडे यांनी रविवारी सांगितले.

मंडळांवर कारवाई

गणेशोत्सव स्वागत मिरवणुकीत वाद्यांचा खणखणाट कायम राहिल्याने कोल्हापुरातील पन्नासवर अधिक मंडळांवर न्यायालयात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.