कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळासाठी ६४ एकर जमीन ऑक्टोबरपर्यंत संपादित केली जाणार आहे, असे विमानतळाचे संचालक अनिल शिंदे यांनी स्पष्ट केले. कोल्हापूर विमानतळ सल्लागार समितीची यावर्षीची पहिली बैठक आज कोल्हापूर विमानतळ ठिकाणी समितीचे अध्यक्ष खासदार शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झाली. विमानतळाचे विस्तारीकरण, नवीन विमान सेवेबाबत या बैठकीत निर्णय घेण्यात आले. जिल्हाधिकारी अमोल येडगे, आमदार सतेज पाटील उपस्थित होते.

हेही वाचा : कोल्हापुरात लेझरमुळे तिघांच्या डोळ्यांना गंभीर इजा; नेत्रविकार तज्ज्ञांकडून बंदी घालण्याची माग

कोल्हापूर विमानतळावरील धावपट्टी विस्तारीकरणाचे काम लवकर पूर्ण करून नवीन हवाई मार्गावर विमानसेवा सुरू करण्यासाठी नियोजन करावे, अशी सूचना शाहू महाराज यांनी केली. विमान प्रवाशांकडून रिक्षाचालक मोठ्या प्रमाणात भाड्याची दर आकारणी करतात, असा मुद्दा उपस्थित करून खासदार धैर्यशील माने यांनी विमानतळ प्रशासनाने हा प्रकार नियंत्रित करण्याची सूचना केली. आमदार ऋतुराज पाटील यांनी विमानतळ विस्तारीकरणांतर्गत भूसंपादन पुनर्वसनाचे तातडीने नियोजन करण्याची गरज व्यक्त केली. सल्लागार समितीचे तेज घाटगे यांनी पुढाकार घेऊन विमानतळ मार्गावर एक खासगी बस देण्यासाठी पुढाकार घेतला.