मालवाहतूक करणारी जीप पुलावरून खाली कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात करवीर तालुक्यातील मादळे गावातील सात जण ठार झाले आहेत, तर १६ गंभीर जखमी आहेत. रविवारी दुपारी तीनच्या आसपास हा अपघात कोल्हापूर-सांगली मार्गावर माले (तालुका हातकणंगले) येथे झाला आहे. नातेवाईकाची रक्षा विसर्जन करून सर्वजण घराकडे परतत होते.

इचलकरंजी येथील एका नातेवाईकाच्या रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमासाठी मादळे येथील २० ते २१ जण सकाळी गेले होते. एक वाजण्याच्या सुमारास हा विधी आवरून सर्व जण जीप गाडीतून परत गावाकडे जाण्यासाठी निघाले. माले गावाजवळ वाहन पोहोचले असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. रस्ता चौपदरीकरणासाठी नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाच्या कठडय़ाला मालवाहतूक करणारी जीप जोराने धडकली. धडक इतकी जोरात होती की जीप ओढय़ात सुमारे २५ फूट खाली कोसळली. या भीषण अपघातामध्ये विलास कोपार्डे (वय ४१), पुतळाबाई  पोवार (वय ६५), कोंडिबा चौगुले (वय ५०), रत्नाबाई पोवार (वय ४८) कोंडिबा चौगुले, नारायण पोवार हे सहा जण ठार झाले. सातव्या मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. एकूण १६ जण जखमी झाले असून त्यातील तिघे जण अत्यवस्थ आहेत.  चार मृतदेह हातकणंगले येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. मात्र वीजपुरवठा नसल्याने सुमारे तासभर शवविच्छेदन होऊ शकले नाही. पोलीस उपअधीक्षक रमेश सरवदे यांनी संपर्क साधल्यानंतर सुधारणा झाली. या अनागोंदी कारभाराबद्दल नातेवाईकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या.